मालदनच्या हायस्कूलला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:38 IST2021-07-29T04:38:14+5:302021-07-29T04:38:14+5:30

मालदन येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, वांग नदीच्या काठावर आहे. नदीला आजपर्यंत अनेकवेळा पूर आला. ...

Floods hit Maldan high school | मालदनच्या हायस्कूलला पुराचा फटका

मालदनच्या हायस्कूलला पुराचा फटका

मालदन येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल, वांग नदीच्या काठावर आहे. नदीला आजपर्यंत अनेकवेळा पूर आला. त्या-त्यावेळी हायस्कूलच्या मैदानावर पाणी आले होते; पण इमारतीला कधीही धोका झाला नव्हता; पण यंदा तीन दिवस जोराचा पाऊस झाल्याने वांग नदीला मोठा पूर आला. त्यामुळे नदीच्या शेजारी असणाऱ्या मराठा हायस्कूलची इमारत पूर्ण पाण्याखाली गेली. या शाळेतील सर्व कागदपत्रे, कीर्द, खतावणी भिजून खराब झाली आहे; तर संगणक रूमधील चौदा संगणक पाण्यात जाऊन मोठे नुकसान झाले आहे. मुख्य इमारतीला लागूनच किचनच्या दोन खोल्या होत्या. त्या पुराच्या पाण्याने भुईसपाट होऊन धान्यासह इतर साहित्य वाहून गेले. कपाटांचेही मोठे नुकसान झाले आहे. शाळेच्या ग्रंथालयातील ३ हजार ६०० पुस्तके भिजून खराब झाली असून, काही वाहून गेली आहेत. याबरोबरच क्रीडा साहित्य, प्रयोगशाळा साहित्य, नकाशे व साठ बेंचेस वाहून गेले आहेत. शाळेच्या सर्व खोल्यात गाळ साचला असून, शाळेचे मोेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संस्थेचे माजी सहसचिव एस. के. कुंभार, माजी सहसचिव आर. के. भोसले यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच भीमराव गायकवाड, माजी सरपंच आबासाहेब काळे, जोतिराज काळे, प्रशांत जंगाणी, प्रमोद ताईगडे, हवालदार तानाजी माने, मुख्याध्यापक एस. पी. तोडसम, एच. के. कुंभार, एस. जे. वाघ, सचिन पाटील, एस. व्ही. पाटील, एच. बी. आतर उपस्थित होते.

Web Title: Floods hit Maldan high school