शेतकरीही वाचू शकतो सहज सातबारा

By Admin | Updated: November 2, 2015 23:56 IST2015-11-02T21:20:36+5:302015-11-02T23:56:32+5:30

सातबारावर स्वत:लाच काही प्रश्न विचारून पाहावेत

Farmers can also easily read Satara | शेतकरीही वाचू शकतो सहज सातबारा

शेतकरीही वाचू शकतो सहज सातबारा

सातबाराचा उतारा हा शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुखी करणे, तसाच तो दु:खी करण्यासही कारणीभूत होऊ शकतो. कारण या उताऱ्यावरील नोंदी जर वेळोवळी अचूक करून ठेवण्याची दक्षता शेतकऱ्यांने घेतली नाही, तर कोर्ट खटले सुरू होतात. पर्यायाने झालेला दोष अद्ययावत करून घेण्यात शेतकरी पूर्ण बरबादही होतो, अशी अनेक उदाहरणे आहेत.
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम व योजना राबवत आहे, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यास सातबारा उतारा अल्प किमतीत देणे, घरपोच देणे, खाते पुस्तिका देणे, अशा एक ना अनेक योजना राबविल्या गेल्या जात आहेत.
मुळात अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत की, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा सातबारा उतारा अगदी समक्ष त्याचे हातात दिला तरी त्यावरील नोंदी त्याला कळतात का? त्याचा त्याने अभ्यास केला आहे का? ता समजा अडाणी असला अगर त्याला समजत नसल्यास त्याने माहीतगार व्यक्तीकडून अगर कायदे सल्लागारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे शेतकऱ्यास सातबारा उतारांवरील नोंदी कोणत्या आहेत व त्या योग्य आहेत का याची पूर्ण माहिती होणे जरूर आहे.
सातबारा च्या उताऱ्यावरील नोंदी शेतकऱ्याने जर बारकाईने वाचल्या व वाचत असतानाच जर स्वत:लाच पुढील प्रश्न विचारले तर उताऱ्यावरील नोंदी अचूक आहेत का, दुरुस्त करून घेणे जरुरीचे आहे याचा बोध होईल. सुशिक्षित शेतकऱ्याला तर स्वत:लाच योग्य ते उत्तर मिळेल व जर शेतकरी अडाणी असेल तर मात्र तो कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तीस, मित्र, माहितीची व्यक्ती, कायदे सल्लागार यांनाही हे प्रश्न विचारून त्याची खात्री करून घेऊ शकतो.
सुशिक्षित व्यक्तीस विचारून जर एखाद्या नोंदीबद्दलचे उत्तर ‘झालेली अगर असलेली नोंद योग्य नाही’ असे उत्तर मिळाले, तर लगेचच कायदेशीर सल्ला घ्यावयास पाहिजे. त्याचबरोबर महसूल विभागाच्या सक्षम प्राधिकरणाकडे संपर्क साधून दाद मागावयास पाहिजे. अशा प्रकारे कार्यवाही वेळीच झाली नाही तर पुढे भविष्यात फारच गुंतागुंत वाढते व शेतकरी नाहक नाडला जातो. प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी दिवाळी झाल्यावर व गावची यात्रा झाल्यावर आपल्या सर्व जमिनीचे सातबारा उतारे प्राप्त करून घ्यावेत. शेतकऱ्यांच्या लक्षात तारखा अगर महिना राहण्याची शक्यता कमी असते, म्हणून ठळक वैशिष्ट्याचे हे दोन उदाहरणे दिली आहेत. कारण यावेळी त्या वर्षाची खरीप व रब्बी पिकांची पीक पाहणी झालेली असते. सातबारा उतारे प्राप्त केल्यावर ते एका मजबूत फाईल कव्हरमध्ये सालानुक्रमानुसार ठेवावेत. अन्य काही ठिकाणी ते गुदरण्याचा प्रसंग उद्भवला तर त्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत द्यावी. दुसरा उतारा प्राप्त करून ठेवावा.

सातबारावर स्वत:लाच काही प्रश्न विचारून पाहावेत
माझ्या जमिनीचा किंवा भूखंडाचा सर्व्हे नंबर अगर गट नंबर अगर भूखंड नंबर बरोबर आहे का?
सातबाराच्या उतारावर डाव्या बाजूस क्षेत्राचा, आकाराचा तपशील नमूद करण्यात आला आहे, तो बरोबर आहे का, मागील सातबाराच्या नोंदीत व आताच्या नोंदीत बदल झाला आहे का? झाला असल्यास योग्य आहे का?
उताऱ्यामधील रकान्यात (चौकटीत) मालकाचे, कब्जेदाराचे नमूद असलेले नाव किंवा नावे योग्य आहेत का? योग्य नसल्यास काय चुकले आहे का? कारण या रकान्यातील नोंदी फारच महत्त्वाच्या असतात.
उताराच्या उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात ‘इतर हक्काच्या’ म्हणजे बिनशेती, कर्ज, इतर हक्कदार, कूळ, विहीर बोजे आदींच्या नोंदी आहेत का? असल्यास त्या योग्य आहेत
का?
उताऱ्याचा खालील भाग हा नमुना
१२ म्हणून आहे. त्यात त्या वर्षात केलेली पिके, त्याखालील क्षेत्र, वहिवाट कोणाची आहे याच्या नोंदी आहेत का? व केलेल्या नोंदी योग्य आहेत का?

सुधाकर करपे

Web Title: Farmers can also easily read Satara