गोपूज येथे अभियंत्याला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST2021-07-30T04:40:52+5:302021-07-30T04:40:52+5:30

औंध : वडूज येथील पाणी पुरवठा अभियंत्याला दोन अज्ञात व्यक्तींनी गोपूजनजीक जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या ...

Engineer beaten up at Gopuj | गोपूज येथे अभियंत्याला जबर मारहाण

गोपूज येथे अभियंत्याला जबर मारहाण

औंध : वडूज येथील पाणी पुरवठा अभियंत्याला दोन अज्ञात व्यक्तींनी गोपूजनजीक जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाणी पुरवठा अभियंता दिलीप महादेव माळी हे (एमएच ११, एडब्लू १८४८) या चारचाकी गाडीमधून वडूज येथील काम आटोपून कऱ्हाडच्या दिशेने निघाले होते. गोपूज येथील कारखान्याच्या पेट्रोल पंपानजीक अज्ञात दुचाकीस्वाराने ‘तुमच्या गाडीतील ऑईल गळत आहे’ असे सांगून थांबवले. माळी यांनी गाडी थांबवताच स्कार्फधारी दोन अज्ञातांनी काठी व गजाने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर कारखाना परिसर व गावातील काही व्यक्तींनी त्यांना हटकले असता, ते पळून गेले. दरम्यान, घटनास्थळी औंध पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणाने झाली, याचा शोध सुरू आहे, लूटमार की पूर्ववैमनस्यातून याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. दिलीप माळी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गुरुवारी उशिरापर्यंत या घटनेची नोंद औंध पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

Web Title: Engineer beaten up at Gopuj