"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:43 PM2021-07-24T17:43:09+5:302021-07-24T17:46:31+5:30

जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे.

Dowry in Maharashtra: Instead of cash parents are demanding flat, car or mutual fund investment | "प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा

"प्रशस्त फ्लॅट किंवा कार घेऊन द्या... मुलीसाठी इतकं तर केलंच पाहिजे ना"; आजही हुंडा ठरतोय मिठाचा खडा

googlenewsNext
ठळक मुद्देपुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. लग्न करताना लग्नाची जबाबदारी ही सर्वस्वी मुलीच्या पालकांचीच अशी समाजधारणा आहे. मुलाकडचे यादी देत राहतात आणि मुलीकडचे त्याच्या पुरवठ्यासाठी प्रयत्नशील राहतात.

हुंड्याचे अजब प्रकार : बोलवेना आणि सहनही होईना अशी स्थिती

>> प्रगती जाधव पाटील

सातारा : स्त्री पुरूष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी चांगलं स्थळ पाहिजे म्हटल्यावर थोडा खर्च करायला काय हरकत आहे, अशी मानसिकता दिसून येत आहे. पूर्वीसारखं रोख रकमेचा हुंडा घेण्याची पद्धत आता बंद होऊन वस्तु स्वरूपांत सुरू असलेली मागणी संसारात मिठाचा खडा टाकत आहे.

पुरोगामी सातारा जिल्ह्यात हुंडा घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्तीची आहे. लाखो रूपये खर्च करून लग्न करून देणं, नवरा-नवरीला दागिने करणं, येणाऱ्यांचा पाहुणचार यासह संपूर्ण संसार उभा करून देण्याकडे वधू पित्याचा कल असतो. पण इतकं सगळं दिलंच आहे तर आता महानगरात एक प्रशस्त फ्लॅटही घेऊन द्या, अशी धक्कादायक मागणी होऊ लागली आहे. ज्या कुटुंबांमध्ये एकच मुलगी किंवा मुलीच आहेत, अशा कुटुंबाला या गोष्टींचा सर्वाधिक त्रास होत आहे. ‘तुमचं जे काही आहे, ते मुलींचंच आहे तर आत्ताच लग्नात करा ना खर्च. आमच्याही लोकांना कळू दे की पुढची पार्टी कशी मिळालीये आम्हाला’, असंही ऐकविण्यात मुलांकडचे कमी पडत नाहीत.

जग कितीही पुढं गेलं आणि चंद्रावर बंगले झाले तरीही समाजाची लग्नात मुलीकडून घेण्याची वृत्ती काही कमी होत नाही. हुंडा न म्हणता त्याला मुलींच्या सुखासाठी ‘इतकं तर केलं पाहिजे’ हा सहजभाव त्या बोलण्यात असतो. पण मुलीला वाढविताना तिच्या शिक्षणासाठीही तितकाच खर्च पालकांनी केलाय हे विचारच लग्नाच्या चर्चेत येत नाहीत. तिथं सौदा होतो मुलीला घरात घेण्यासाठी आणि तिला कायमस्वरूपी हक्काचं आडनाव देण्यासाठीच!

अशिक्षितापासून उच्च शिक्षितांपर्यंत सगळेच!

लग्न करताना लग्नाची जबाबदारी ही सर्वस्वी मुलीच्या पालकांचीच अशी समाजधारणा आहे. त्यामुळे मुलाकडचे यादी देत राहतात आणि मुलीकडचे त्याच्या पुरवठ्यासाठी प्रयत्नशील राहतात. ही कथा शिक्षित आणि अशिक्षितांमध्येही सारख्या प्रमाणातच पहायला मिळते. ज्या कुटूंबांमध्ये फक्त मुलगी किंवा मुली आहेत, तिथे तर सगळं आमचंच अशी धारणा करून वाट्टेल तेवढं लुटायचं धोरण मुलाकडचे अवलंबतात.

हुंडा म्हणायचा का पोराचा लिलाव?

>> मुलीला आवडेल अशा ठिकाणी घर बघा
>> लेकीच्या आवडीची गाडी द्या
>> तुमच्या मुलीला आवडेल असाच संसार द्या
>> मुलीच्या पतीला कायमस्वरूपी काम लागावं म्हणून पैसे तुम्हीच द्या
>> तुम्हाला जे काही द्यायचं ते मुलीलाच द्या आम्हाला नको
>> रोख रक्कम नको पण म्युच्युअलमध्ये गुंतवणूक तिच्या नावाने करा

मुलींचे माता-पिताही जबाबदार

ठरवून केलेली लग्न ही बऱ्याचदा दोन कुटुंबाची होतात. त्यामुळे दोन्हीकडची मंडळी एकत्र बसून देवाणघेवाणीचा विचारविनिमय झाल्यानंतरच लग्न ठरतं. आमच्या तोलामोलाचं स्थळ बघा असं म्हणणारे मुलींचे पालक आपल्यापेक्षा उच्च कुटुंबात लेक जावी असा अट्टाहास करतात. त्यामुळे उच्च कुटुंबातील सर्वोच्च गोष्टी पुरवेपर्यंत त्यांना नाकेनऊ येते. आपल्या ऐपतीएवढाच खर्च करण्यापेक्षा खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्ज काढून लग्न करणारे पालकही या समाजात अस्तित्वात असल्याचे मत अ‍ॅड. मनिषा बर्गे यांनी व्यक्त केले.

नवी पिढी बदलतेय...!

नुकतंच माझ्या कुटुंबीयांना मी माझ्या होणाऱ्या पत्नीशी गाठ घालून दिली. ती स्वत: शिकलेली आहे, त्यामुळे ती स्वावलंबी असून तिच्या कुटूंबियांबरोबर लग्न ठरवताना कुठलाही सौदा करायचा नाही, हे आम्ही ठरवलं होतं. पुढच्या वर्षी आम्ही लग्न करायचं निश्चित केलं आहे.
- आकाश पवार, सदरबझार

माझ्या पत्नीला भाऊ नाही. त्यामुळे भोसले कुटुंबीयांचा जावई म्हणून सासु सासऱ्यांची जबाबदारी ही माझीच असणार याची मला जाणीव आहे. लग्न करतानाही अनाठायी खर्च करायचा नाही, असं आम्ही सक्त बजावलं होतं. लॉकडाउनमध्ये लग्न केल्याने त्यांचा खर्चही वाचला.
- स्वप्नील कासुर्डे, सातारा

Web Title: Dowry in Maharashtra: Instead of cash parents are demanding flat, car or mutual fund investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.