टीका नको.. पाणी आणू ! : शिवतारे

By Admin | Updated: November 5, 2015 23:48 IST2015-11-05T23:32:45+5:302015-11-05T23:48:40+5:30

‘जिल्ह्यातील विरोधकांनी विकासासाठी एकत्र यावे’

Do not criticize .. bring water! : Sivatare | टीका नको.. पाणी आणू ! : शिवतारे

टीका नको.. पाणी आणू ! : शिवतारे

सातारा : ‘येत्या चार वर्षांत कोणत्याही परिस्थितीत जिहे-कटापूरचे काम पूर्ण करणारच, तसेच सातारा मेडिकल कॉलेजही आणणारच. मात्र, त्यासाठी विरोधकांनी केवळ विरोधाचे राजकारण न करता सहकार्य करावे. शेवटच्या सहा महिन्यांत मग काय संघर्ष करायचाय तो आपण करू,’ अशी भूमिका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत मांडली.
तब्बल ५० दिवसांनंतर सातारा जिल्ह्यात पाऊल ठेवणाऱ्या विजयबापूंना साताराच्या पत्रकारांनी अनेक उलटे-सुलटे प्रश्न विचारले; मात्र कोणावरही टीका न करता केवळ जिल्ह्याच्या विकासाचीच चर्चा त्यांनी केली. बापू पुढे म्हणाले की, ‘मेडिकल कॉलेजच्या जागेसंदर्भात नुकतीच कृष्णा खोरे महामंडळाची बैठक घेतली असून, सर्व तांत्रिक अडचणी बाजूला सारून लवकरात लवकर अहवाल पाठविण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. हे कॉलेज येत्या चार वर्षांत साताऱ्यात साकार होणारच.’‘माझ्याकडे तीन खात्यांचा कार्यभार असून, पुरंदर मतदारसंघही पाहावा लागत असल्याने, जिल्ह्यात सारखे येणे शक्य नाही; मात्र मी सतत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी संवाद साधून अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. सध्या विरोधकांनी विकासासाठी सहकार्य करावे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सहा महिने काय राजकीय संघर्ष करायचा तो करू,’ असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला आमदार शंभूराज देसाई, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, हरणाई सूतगिरणीचे रणजितसिंह देशमुख, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

ग्रामपंचायत नको; विधानसभेला बोलू!
सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-सेनेला अपयश मिळाले, याबाबत पत्रकारांनी छेडले असता, विजय बापू म्हणाले की, ‘ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल म्हणजे पक्षाच्या यशापयशाचा निकष नव्हे. आपण ग्रामपंचायतीवर नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीत या विषयावर बोलू.’

Web Title: Do not criticize .. bring water! : Sivatare