व्यावसायिकांना कोरोना तपासणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST2021-03-07T04:36:19+5:302021-03-07T04:36:19+5:30

तरडगाव : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नये, यासाठी गावातील दुकानदार, हॉटेल चालकांसह इतर सर्व व्यावसायिकांनी पुढील ...

Corona inspection mandatory for professionals | व्यावसायिकांना कोरोना तपासणी बंधनकारक

व्यावसायिकांना कोरोना तपासणी बंधनकारक

तरडगाव : कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू नये, यासाठी गावातील दुकानदार, हॉटेल चालकांसह इतर सर्व व्यावसायिकांनी पुढील चार दिवसांमध्ये कोरोना तपासणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घ्यावी,’ असे आवाहन तरडगाव ग्रामपंचायतीने नोटीसद्वारे केले आहे.

गत आठवड्यापासून गावात कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून शासनाने जे नियम लागू केले आहेत, त्यांचे पालन होताना दिसत नाही. परिसरात तोंडाला मास्क लावणारे कमीच दिसतात. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. परिणामी रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी लवकर करून घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. येत्या चार दिवसांत ही तपासणी करावयाची आहे, तसे न केल्यास संबंधित व्यावसायिकाची कोरोना चाचणी होईपर्यंत त्याचा व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच व्यावसायिकाने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, स्वतः दुकानदार तसेच कामगार व दुकानात येणाऱ्या व्यक्तीने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या बाबींचा दैनंदिन कामकाजात वापर करावा. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(कोट..)

आठवडा बाजारात वावरताना सर्वांनी मास्कचा वापर करून सुरक्षित अंतर ठेवावे. एकाच ठिकाणी अनेकांनी गर्दी करू नये. बाजार काळात पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी देखरेखीसाठी असणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार व्यावसायिकांनी कोरोना चाचणी लवकर करून घ्यावी.

-जयश्री चव्हाण,सरपंच, तरडगाव

Web Title: Corona inspection mandatory for professionals