Satara: बदली प्रकरणातून संतप्त कामगार-व्यवस्थापन अधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:24 IST2025-03-21T14:23:49+5:302025-03-21T14:24:11+5:30
परस्परविरोधी तक्रार

Satara: बदली प्रकरणातून संतप्त कामगार-व्यवस्थापन अधिकाऱ्यांत जोरदार हाणामारी, गुन्हा दाखल
कोरेगाव : सातारा रोड येथील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजनमधील कामगारांची वालचंदनगर शाखेकडे बदली केल्यामुळे संतप्त कामगार आणि व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री सव्वा वाजता दोन वेगवेगळे परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड फाउंड्री डिव्हिजनमधील अधिकारी इंद्रजीत वसंतराव हांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कंपनीच्या बिझनेस ऑफिसमध्ये आमची बदली कोणाला विचारून केली? या कारणावरून चिडून जाऊन बुधवारी दुपारी चारच्या सुमारास वैभव सदाशिव फाळके, विशाल प्रकाश फाळके आणि मनोज बाजीराव फाळके यांनी शिवीगाळ केली. वैभव फाळके यांनी लाकडी खुर्ची उचलून माझ्या डाव्या बरगडीवर मारली.
मनोज फाळके, विशाल फाळके यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
माझे सहकारी विशाल बाळासाहेब गायकवाड हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता, त्यांनाही या तिघांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. विशाल फाळके यांनी तुम्ही उद्यापासून कामावर आला तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली आहे.
वैभव सदाशिव फाळके यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, विशाल गायकवाड, इंद्रजीत वसंतराव हांडे यांनी कंपनीच्या बिजनेस ऑफिसमध्ये ट्रान्सफर ऑर्डर केली असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन त्यांना व मनोज बाजीराव फाळके आणि विशाल प्रकाश फाळके यांना तुम्हाला जिवंत सोडत नाही, अशी धमकी देत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीत खाली पडल्याने विशाल गायकवाड यांनी मला ऑफिसमधील लाकडी खुर्ची अंगावर फेकून मारली. त्यामध्ये माझ्या उजव्या पायाच्या तळपायास जखम झाली आहे. उजव्या कानाच्या वरच्या बाजूस मुका मार लागला असून, ओठाच्या खालच्या बाजूस जखम झाली आहे.
दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन साळुंखे आणि हवालदार शिंदे तपास करत आहेत.