ताईगडेवाडीतील दारूबंदी मतदानात गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:42 IST2021-03-09T04:42:21+5:302021-03-09T04:42:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पाटण तालुक्यातील ताईगडेवाडी येथे उभी बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून, ...

Alcohol abuse in Taigadewadi | ताईगडेवाडीतील दारूबंदी मतदानात गैरप्रकार

ताईगडेवाडीतील दारूबंदी मतदानात गैरप्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : पाटण तालुक्यातील ताईगडेवाडी येथे उभी बाटली आडवी करण्यासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत गैरप्रकार झाला असून, प्रशासनाने एक वर्ष पूर्ण झाले तरी याचा निकाल जाहीर केलेला नाही. या गैरप्रकारातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करीत सिताई फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महिलांनी प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध नोंदविला. महिलांनी याबाबत ८ मार्चला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याने महिलांनी महिला दिनी आंदोलन केले.

याबाबत कविता कचरे म्हणाल्या, ताईगडेवाडी येथे दारूबंदीसाठी खुल्या पद्धतीने मतदान घ्यावे, अशी आम्ही मागणी केली होती. मात्र, ती मान्य केली नाही. दारूबंदीसाठी जे गुप्त मतदान झाले, त्याच्या निकालाबाबत आम्हाला अंधारात ठेवले आहे. यामागे शासनाची भूमिका नेमकी काय आहे, ते लिखित स्वरुपात कळवावे. सावित्रीच्या जिल्ह्यातच महिलांची अवहेलना प्रशासनाने केली आहे. एकीकडे महिला सबलीकरणाच्या गोष्टी केल्या जातात तर दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे आजही महिलांना न्याय मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही.

या आंदोलनात सुजाता ताईगडे, सुमन ताईगडे, सिताई फाउंडेशनच्या उपाध्यक्षा प्रतिभा साठे, सचिव प्रतिभा शेडगे, खजिनदार माधुरी काळे यांच्यासह ताईगडेवाडीतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कोट...

ताईगडेवाडीतील दारूबंदीबाबत प्रशासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर मंत्रालयापुढे जाऊन आम्हाला न्याय मागावा लागेल. जिल्हा प्रशासन न्याय देणार नसेल तर मंत्रालयावरच महिला मोर्चा काढतील.

- कविता कचरे

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताईगडे (ता. पाटण) येथे दारूबंदी करावी, या मागणीसाठी सोमवारी महिलांनी धरणे आंदोलन केले.

Web Title: Alcohol abuse in Taigadewadi