शिक्षकाकडून तीन शाळकरी मुलींच्या विनयभंगाचा प्रकार, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:00 IST2024-09-10T11:59:58+5:302024-09-10T12:00:36+5:30
कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची ...

शिक्षकाकडून तीन शाळकरी मुलींच्या विनयभंगाचा प्रकार, सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
कवठेमहांकाळ (जि. सांगली) : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षांच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. संशयित भरत विश्वनाथ कांबळे (वय ४८, रा. सुभाषनगर, ता. मिरज) असे शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलींच्या आईने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचे संतप्त पडसाद गावात उमटले. पालक आणि संतप्त जमावाने शिक्षक कांबळेला चोप देत कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षक भरत कांबळे शिकविण्यास होता. शाळेत शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत होता. दि. ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला. पीडित मुलींनी हा प्रकार घरी सांगितला. सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केले. परंतु, वारंवार हा प्रकार होत असल्याची माहिती पालकांना मिळाली. त्यामुळे पालक लक्ष ठेवून होते. सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना शिक्षक कांबळे याने मुलींबरोबर अश्लील प्रकार सुरू केला. लक्ष ठेवून असलेल्या पालकांना हा प्रकार निदर्शनास आला.
तातडीने निलंबन
शिक्षकाने विनयभंग केल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना गटशिक्षणाधिकारी प्रमोद गोपणे यांनी दिली. तेव्हा धाेडमिसे यांनी तातडीने दखल घेत शिक्षक कांबळे याच्यावर निलंबनाची कारवाई केली.