Sangli: कोकरुडमध्ये मोबाईलवरील स्टेटसमुळे तणाव, गावात जमावबंदीचा आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:49 IST2025-11-25T12:49:27+5:302025-11-25T12:49:52+5:30
पोलिसांचे शांततेचे आवाहन

Sangli: कोकरुडमध्ये मोबाईलवरील स्टेटसमुळे तणाव, गावात जमावबंदीचा आदेश लागू
शिराळा : कोकरूड (ता. शिराळा) येथील एका युवकाने मोबाईलवर एका कार्यक्रमाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले. मागील दोन दिवसांपासून दोन्ही गटात धुसफूस सुरु होती. याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावात जमावबंदी आदेश लागू केला आहे. सद्यस्थितीत गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असून शांततेचे आवाहन केले आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी एका युवकाने एका कार्यक्रमाचे स्टेटस् मोबाईलवर ठेवले होते. यावरून गैरसमज निर्माण होऊन दोन गटांत शाब्दिक चकमक झाली. मागील दोन दिवसांपासून दोन्ही गटांत तणावपूर्ण परिस्थिती होती. स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तणाव वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कठोर पावले उचलली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी या घटनेची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. गावात यापूर्वी २०२३ मध्ये काही युवकांनी टी-शर्टवर वादग्रस्त फोटो छापून फिरल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी संबंधित युवकांना समज देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा स्टेटसवरून वाद झाला आहे. संबंधित युवकावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश
पोलिसांनी गावात स्पीकरवरून घोषणा करत जमावबंदी आदेशाची माहिती दिली आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गावपातळीवर तातडीने बैठक: शांततेचे आवाहन
सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील प्रमुख नागरिकांची तातडीने बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. तसेच, रात्री उशिरा गावातील प्रमुखांची बैठक झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवाहन करण्यात आले.