सत्तर लाखांच्या फसवणुकीमुळे शिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:57+5:302021-02-20T05:18:57+5:30

सांगली : शेती, व्यवसायासाठी कर्ज काढून दिल्यानंतर ती रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने शिक्षकाने आत्महत्या केल्याप्रकरणी आठ महिन्यांनी दोघांवर ...

Teacher commits suicide due to fraud of Rs | सत्तर लाखांच्या फसवणुकीमुळे शिक्षकाची आत्महत्या

सत्तर लाखांच्या फसवणुकीमुळे शिक्षकाची आत्महत्या

सांगली : शेती, व्यवसायासाठी कर्ज काढून दिल्यानंतर ती रक्कम परत देण्यास टाळाटाळ केल्याने शिक्षकाने आत्महत्या केल्याप्रकरणी आठ महिन्यांनी दोघांवर गुन्हा दाखल झाला. भारत संभाजी सावंत (वय ४६, रा. दत्तनगर, वसंतनगर, सांगली) असे मृताचे नाव असून, महादेव हणमंत पाटील (रा. बामणोली, ता. मिरज) व अमर शंकर आंबेकर (रा. रंकाळा टॉवर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नीता भारत सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

मृत भारत सावंत आणि त्यांची पत्नी नीता हे दोघेही शिक्षक होते. भारत सावंत यांनी संशयित पाटील याला शेती व प्लॉट घेण्यासाठी काही बँका व पतसंस्थेतून कर्ज घेऊन ३८ लाख रुपयांची रक्कम दिली होती, तर दुसरा संशयित आंबेकर यास, हॉटेल सुरू करण्यासाठी ३५ लाख रुपये दिले होते. यातील चार लाख रुपये त्याने परत दिले होते. मात्र, आर्थिक अडचण असल्याने सावंत यांनी दोघा संशयितांकडे दिलेले सर्व पैसे परत मागितले होते. तथापि ६९ लाख रुपये परत न देता, त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशी धमकी संशयितांनी दिली होती. मानसिक त्रासातून भारत सावंत यांनी ६ जून २०२० रोजी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यादरम्यान संशयितांनी सर्व पैसे परत देतो, असे भारत सावंत यांची पत्नी नीता यांना सांगितले होते. आठ महिने वाट पाहूनही पैसे न मिळाल्याने नीता सावंत यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Teacher commits suicide due to fraud of Rs