आॅगस्टमध्ये होणार दीड लाख बियांची पेरणी--

By Admin | Updated: June 5, 2015 00:19 IST2015-06-04T23:55:15+5:302015-06-05T00:19:01+5:30

डॉल्फिन ग्रुपचा उपक्रम : वन संरक्षक समिती सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग पर्यावरण दिन विशेष

Sowing of 1.5 lakh seeds in August - | आॅगस्टमध्ये होणार दीड लाख बियांची पेरणी--

आॅगस्टमध्ये होणार दीड लाख बियांची पेरणी--

नरेंद्र रानडे - सांगली -मागील काही वर्षांपासून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील ठराविक भागात बियारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा २ आॅगस्ट रोजी सागरेश्वर, चांदोली, दंडोबा परिसरात सुमारे दीड लाख विविध प्रकारच्या बियांची पेरणी करण्यात येणार आहे.
पर्यावरण समतोलासाठी झाडांची गरज असते. मात्र ‘सर्व काही शासनाने करावे आणि आपण शांत चित्ताने बसावे’ ही जनमानसात रुजलेली वृत्ती नाहीशी व्हावी, यासाठी बिया संकलन आणि रोपणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवसेंदिवस वृक्षांची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी सर्वांनाच ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन जीवनात आपण नानाविध प्रकारची फळे खातो आणि नंतर त्यातील बिया कचऱ्यात फेकून देतो. या वाया जाणाऱ्या बियांचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘डॉल्फिन’तर्फे २००३ पासून बिया संकलनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना, त्यांनी संकलित केलेल्या बियांची माहिती सविस्तर लिहून देणे आवश्यक असते.
प्रतिवर्षी राज्यातील वृक्षप्रेमी बिया संकलनाच्या या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होतात, परंतु सर्वच बिया या पश्चिम महाराष्ट्राच्या हवामानात रुजत नाहीत. याकरिता केवळ आपल्याकडे जी झाडे येऊ शकतील, अशा बिया वेगळ्या काढण्यात येतात व त्या बियांची पेरणी जिल्ह्यातील विविध भागात करण्यात येते.
बाकीच्या बिया संबंधित जिल्ह्यातील स्पर्धकांकडे परत पाठविण्यात येऊन त्यांची पेरणी त्या-त्या स्थानिक भागात केली जाते.


तेरा वर्षांपासून प्रयत्न
‘डॉल्फिन’च्या माध्यमातून मागील तेरा वर्षांच्या कालावधित राज्यातून सुमारे १० लाख विविध बिया संकलित करून त्यांची विविध भागात पेरणी करण्यात आली आहे.

Web Title: Sowing of 1.5 lakh seeds in August -