कलाक्षेत्रातील तारा होऊन चमकण्याचे उराशी बाळगलेले ‘शौर्य’चे स्वप्न विरले; शाळा बदलायची होती, तोपर्यंतच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:16 IST2025-11-21T18:16:01+5:302025-11-21T18:16:37+5:30
मुलांसमोर केला जाणारा अपमान असह्य झाल्याने आयुष्य संपविले

कलाक्षेत्रातील तारा होऊन चमकण्याचे उराशी बाळगलेले ‘शौर्य’चे स्वप्न विरले; शाळा बदलायची होती, तोपर्यंतच...
दिलीप मोहिते
विटा : मनातल्या आवडत्या रंगांनी स्वप्नांचा कॅनव्हास रंगविण्याचा प्रयत्न शालेय जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मुले करीत असतात. असाच एक कॅनव्हास शौर्य पाटीलने मनात रंगविला होता. संगीत, नृत्य अन् सर्वच कलाप्रकारांबद्दल आवड जपत या क्षेत्रात चमकण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शौर्यला शाळेतला अपमान सहन झाला नाही. वेगाने धावणाऱ्या मेट्रोप्रमाणे स्वप्नांच्या मागे धावताना त्याने नवी दिल्लीतील मेट्रोच्या समोर आपल्या आयुष्याला ब्रेक लावला. आई-वडील, शाळेतले सवंगडी यांना धक्का देत त्याने निरोप घेताना शिक्षण व्यवस्थेमधील बिघडलेल्या ट्रॅकवर बोट ठेवले.
पाटील कुटुंबीय मूळचे सांगली जिल्ह्यातील ढवळेश्वर (ता. खानापूर) याठिकाणचे. सोने चांदी गलाई व्यवसायानिमित्ताने शौर्यचे वडील प्रदीप पाटील यांनी सुरुवातीला मुंबई अन् नंतर दिल्लीत वास्तव्य केले. सध्या ते दिल्लीत दोन मुले व पत्नीसह राहत होते. मोठा मुलगा पार्थ बी.बी.ए.च्या प्रथम वर्षात शिकत आहे. शौर्य हा घरात लहान असल्याने सर्वांचा लाडका होता. शांत व तितकाच विचाराने परिपक्व होता. शिक्षणातही त्याची प्रगती चांगली होती. मात्र, शाळेत सर्व मुलांसमोर होणाऱ्या अपमानाने तो त्रस्त होता. नेमक्या याच गोष्टीने त्याचे खच्चीकरण झाले. तो इतका खचला की त्याने मेट्राे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत आयुष्य संपविले.
परीक्षा झाल्यानंतर शाळा बदलायची होती
शाळेत होणाऱ्या अपमानाबद्दल आई-वडिलांना त्याने कल्पना दिली होती. परीक्षा जवळ आल्याने ती होताच शाळा बदलण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. मात्र, तेवढ्यातच शौर्यने आत्महत्या केल्याने पाटील कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
बहिणीच्या लग्नात त्याने मने जिंकली
काही महिन्यांपूर्वी चुलत बहिणीच्या लग्नात शौर्यने सुंदर नृत्य केले. त्याने सर्वांची मने जिंकली. कला क्षेत्रातील त्याची आवड यावेळी सर्वांना समजली. संगीत व नृत्य याप्रती त्याचे आकर्षण होते.
गेल्या दहा दिवसांपासून शाळेतील शिक्षक शौर्य यास मानसिक त्रास देत होते. हा प्रकार त्याने आम्हाला घरी सांगितला होता. परंतु, परीक्षा दहा दिवसांवर आल्यामुळे परीक्षा झाल्यानंतर त्याला आम्ही दुसऱ्या शाळेत प्रवेश देऊ असे सांगितले होते. परंतु, तोपर्यंत तो थांबला नाही. शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. - प्रदीप पाटील, शौर्यचे वडील