संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उघडकीस, तिघांना अटक; मिरजेतील कॉलेजजवळील जमिनीचा वाद, दोन पिस्तुल, काडतुसे, मोटार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 19:16 IST2026-05-09T19:14:51+5:302026-05-09T19:16:20+5:30

अटकेतील तिघांकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, चार काडतुसे, चाकू, मोटार जप्त करण्यात आली आहे.

Sanjay Bhokare's murder plot exposed, three arrested; Land dispute near college in Miraj, two pistols, cartridges, motor seized | संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उघडकीस, तिघांना अटक; मिरजेतील कॉलेजजवळील जमिनीचा वाद, दोन पिस्तुल, काडतुसे, मोटार जप्त

संजय भोकरे यांच्या खुनाचा कट उघडकीस, तिघांना अटक; मिरजेतील कॉलेजजवळील जमिनीचा वाद, दोन पिस्तुल, काडतुसे, मोटार जप्त

सांगली : मिरजेतील अंबाबाई तालिम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांचा जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून खून करण्याचा कट स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणला. संशयित गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३, रा. लक्ष्मी पार्क, हरिपूर रस्ता, सांगली), विराज प्रकाश बुटाले (वय ४१, रा. आंबेडकर रस्ता, सांगली), संग्राम संभाजी फडतरे (वय २७, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) या तिघांना अटक केली आहे. तर सचिन आवळे (रा. सांगलीवाडी) हा पसार झाला आहे. अटकेतील तिघांकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, चार काडतुसे, चाकू, मोटार जप्त करण्यात आली आहे.

अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर म्हणाल्या, नूतन अधीक्षक तुषार दोशी यांनी शरीराविरूद्धचे गुन्हे रोखले जावेत, अवैध शस्त्रांची तस्करी रोखावी यासाठी गुन्हे अन्वेषणला विशेष पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक त्यानुसार कार्यरत आहेत. हे पथक पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संदीप पाटील, विनायक सनदी यांना संशयित गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम फडतरे हे तिघेजण सांगलीतील एका महत्वाच्या व्यक्तीचा खून करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिघांवर पाळत ठेवली. पाटणे प्लॉट ते अंकलीकडे जाणाऱ्या काळीवाट रस्त्यावर एका शेतात अंधारात तिघेजण मोटार (एमएच १० एबी ५९३५) मध्ये बसल्याचे मिळून आले. तिघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. तेव्हा गणेश व विराजच्या कमरेला पिस्तुल आणि दोन काडतुसे मिळाली. तसेच मोटारीत चाकू देखील आढळून आला.

तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा संशयित विराज बुटाले याने खरी हकीकत सांगितली. विराज याच्या ओळखीचा संशयित सचिन आवळे आणि सहहिस्सेदार यांच्या नावाने मिरजेतील भोकरे इंजिनियरिंग कॉलेजजवळ दोन एकर जमीन आहे. ही जमीन सध्या संजय भोकरे यांच्या कब्जात आहे. ती जमीन सोडवून घेण्यासाठी संजय भोकरे यांना ठार मारले तर सहजासहजी जमीन ताब्यात घेता येईल. जमीन विक्रीच्या आर्थिक व्यवहारात तुला मोबदला देतो असे आवळे याने विराज याला सांगितले. विराजने भोकरे यांना जीवे मारण्यासाठी गणेश लोखंडे व संग्राम फडतरे यांना देशी बनावटीची पिस्तुले आणण्यासाठी पैसे दिले. फेब्रुवारी २०२६ मध्ये दोन पिस्तुले व आठ काडतुसे घेतली.

पिस्तुल आणल्यानंतर तिघांनी संजय भोकरे हे सांगलीत डॉ. आंबेडकर स्टेडियमजवळील कार्यालयात केव्हा-केव्हा येतात याची माहिती काढली. त्यासाठी जुनी मोटारही खरेदी केली. मोटारीची ओळख पटू नये म्हणून त्यावर बनावट नंबरप्लेट लावली. भोकरे हे दर शुक्रवारी सांगलीतील कार्यालयात येतात, हे कळाल्यानंतर त्यांनी कट रचला. शुक्रवारी, दि. ८ रोजी तिघांनी त्यांच्यावर गोळीबार करून खून करण्याचा कट रचला. परंतू तत्पूर्वीच पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यामुळे तिघांना अटक करण्यात आल्याचे अप्पर अधीक्षक बारवकर यांनी सांगितले. यावेळी गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार उपस्थित होते. गुन्हे अन्वेषणचे अंमलदार संकेत कानडे, अभिजीत माळकर, अमोल ऐदाळे, प्रकाश पाटील, रोहन घस्ते, सूरज थोरात, शिवाजी सिद, सतीश आलदर, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. पोलिस कर्मचारी संदीप पाटील यांनी फिर्याद दिली असून उपनिरीक्षक सागर होळकर तपास करत आहेत.

दोघेजण पूर्वाश्रमीचे राजकीय पदाधिकारी -
विराज बुटाले हा पूर्वी उद्धवसेनेचा शहरप्रमुख होता. तर गणेश लोखंडे हा देखील पूर्वी तालुकाप्रमुख होता. सध्या लोखंडे याची वीटभट्टी आहे. तर बुटाले याचा बार आहे. लोखंडे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने वीटभट्टीवर काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराच्या मदतीने पिस्तुल खरेदी केले होते.

झाडावर गोळ्या झाडून सराव -
फेब्रुवारीमध्ये पिस्तुल आणल्यानंतर ते चालू असल्याचे खात्री करण्यासाठी तसेच सराव म्हणून तिघांनी काळीवाट येथे एका नारळाच्या झाडात चार गोळ्या झाडल्या होत्या. पोलिस चौकशीत हे स्पष्ट झाले आहे.

चेहरा झाकून खून करणार होते -
संजय भोकरे हे सांगलीत कधी येतात याची माहिती मिळवली होती. त्यांच्या जाण्याचा मार्गही त्यांनी माहिती करून घेतला होता. वाटेत थांबवून त्यांच्यावर गोळ्या झाडणार होते. कोणी ओळखू नये म्हणून चेहरा झाकणार असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.

Web Title : संजय भोकरे हत्याकांड का षडयंत्र उजागर; भूमि विवाद में तीन गिरफ्तार

Web Summary : मिराज के कॉलेज के पास भूमि विवाद को लेकर संजय भोकरे की हत्या का षडयंत्र पुलिस ने उजागर किया। हथियार के साथ तीन संदिग्ध गिरफ्तार, एक फरार। आरोपियों ने वित्तीय लाभ के लिए विवादित भूमि पर कब्जा करने के लिए भोकरे की हत्या की योजना बनाई।

Web Title : Sanjay Bhokare Murder Plot Unveiled; Three Arrested Over Land Dispute

Web Summary : Police uncovered a plot to murder Sanjay Bhokare over a land dispute near Miraj's college. Three suspects were arrested with weapons, while one remains at large. The accused planned to kill Bhokare to seize disputed land, with motives of financial gain.