सांगली रेल्वे स्थानकाचे प्रवासी उत्पन्न २१ कोटी पार, नवीन एक्स्प्रेस गाड्यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:38 IST2026-05-14T18:38:30+5:302026-05-14T18:38:56+5:30

वर्षभरात २६ लाख प्रवाशांनी केला प्रवास 

Sangli railway station's passenger revenue crosses 21 crore, demand for new express trains | सांगली रेल्वे स्थानकाचे प्रवासी उत्पन्न २१ कोटी पार, नवीन एक्स्प्रेस गाड्यांची मागणी 

सांगली रेल्वे स्थानकाचे प्रवासी उत्पन्न २१ कोटी पार, नवीन एक्स्प्रेस गाड्यांची मागणी 

सांगली : सांगलीरेल्वे स्टेशनने प्रवासी उत्पन्नात मोठी झेप घेत देशातील महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांच्या एनएसजी ३ श्रेणीत स्थान मिळवले आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सांगली रेल्वे स्टेशनचे वार्षिक प्रवासी उत्पन्न तब्बल २१ कोटी रुपयांच्या पार गेल्याची माहिती मध्य रेल्वेकडून माहिती अधिकारात देण्यात आली. या रेल्वे स्टेशनवरून वर्षभरात २६ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

नागरिक जागृती मंचाचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात याबाबतची माहिती मागविली होती. त्यातून रेल्वे स्टेशनचे वार्षिक उत्पन्न २१ कोटीवर गेल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट केले. वर्षभरात सुमारे २६ लाख प्रवाशांनी सांगली रेल्वे स्टेशनचा वापर केला. सांगली स्टेशनवरून दररोज ७०हून अधिक रेल्वे गाड्या थांबतात. पुणे, बेळगाव, हुबळी, धारवाडकडे धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांसह बंगळुरू - चंदीगड संपर्क क्रांती एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा त्यात समावेश आहे.

सांगली स्टेशनवरून दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे, हरिद्वार, जयपूर, अहमदाबाद, नागपूर, गोवा, केरळ, कन्याकुमारी यांसह देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. सांगलीसह कोल्हापूर, इचलकरंजी आणि परिसरातील प्रवासी मोठ्या प्रमाणावर या स्टेशनचा वापर करतात. शिराळा, इश्वरपूर, आष्टा, विटा, तासगाव, खानापूर परिसरातील नागरिक एसटी आणि रिक्षाद्वारे स्टेशनपर्यंत पोहोचत असल्याने प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचाने सांगली, मिरज आणि किर्लोस्करवाडी या रेल्वे स्थानकांच्या विकासाची मागणी केली आहे. सांगली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ व ५चे उद्घाटन तातडीने करावे, लिफ्ट व एस्केलेटरचे काम पूर्ण करावे, रेल्वे गाड्यांसाठी पाणी भरण्याची सुविधा आणि चालक - गार्डसाठी आराम कक्ष उभारावा, सांगली - हुबळी - चेन्नई एक्स्प्रेस व सांगली - मिरज - लोंढा - मडगाव - तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस सुरू करावी, मिरज जंक्शनवरून उत्तर भारतासाठी नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू कराव्यात, मिरज - निजामुद्दीन आणि मिरज - बिकानेर एक्स्प्रेस दैनंदिन कराव्यात, अशीही मागणी करण्यात येणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले.

र्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरील आरक्षण तिकीट खिडकी रात्रीपर्यंत सुरू ठेवावी, तसेच भिलवडी, ताकारी, जत रोड, कवठेमहांकाळ आदी स्टेशनवर अधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी मंचाने केली आहे. सांगली जिल्ह्याला सोलापूरशी थेट रेल्वेने जोडण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंचाने स्पष्ट केले.

वंदे भारतमधून एक लाख लोकांचा प्रवास

सांगली - बंगळुरू ‘राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस’मधूनच कर्नाटकच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे ३ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. तसेच सांगली - परळी एक्स्प्रेसला वर्षभरात ५० हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली स्टेशनवर थांबणाऱ्या चार वंदे भारत गाड्यांतून जवळपास एक लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Web Title : सांगली रेलवे स्टेशन की आय 21 करोड़ पार, नई ट्रेनों की मांग

Web Summary : सांगली रेलवे स्टेशन ने 21 करोड़ रुपये से अधिक का राजस्व अर्जित किया, एनएसजी-3 का दर्जा प्राप्त किया। नागरिकों ने बेहतर सुविधाओं, प्रमुख शहरों के लिए नई एक्सप्रेस ट्रेनों और प्रमुख मार्गों के लिए दैनिक सेवा की मांग की।

Web Title : Sangli Railway Station's income exceeds 21cr, demands for new trains.

Web Summary : Sangli railway surpasses ₹21 crore in revenue, earns NSG-3 status. Citizens demand better facilities, new express trains to major cities, and daily service for key routes.