प्रेमविवाहानंतर पतीची 'चॉईस' बदलली; तृतीयपंथी सोबतच्या नको त्या संबंधाना विरोध केल्याने पत्नीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 15:17 IST2026-04-17T15:13:55+5:302026-04-17T15:17:02+5:30
पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून निघृण खून केल्याची घटना विटा समोर आली आहे.

प्रेमविवाहानंतर पतीची 'चॉईस' बदलली; तृतीयपंथी सोबतच्या नको त्या संबंधाना विरोध केल्याने पत्नीची हत्या
Sangli Crime: सांगलीच्या विटा शहरातील नेवरी रस्त्यावरील सुतारकी मळा परिसरात एका प्रेमविवाहाचा अत्यंत भीषण आणि थरकाप उडवणारा अंत झाला आहे. पतीच्या तृतीयपंथी व्यक्तींसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे, संतापलेल्या पतीने आपल्या २० वर्षीय पत्नीची लोखंडी रॉडने डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या केली. श्रद्धा अविनाश लोटके असे या मृत महिलेचे नाव असून, या घटनेने संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.
मैत्री, प्रेम अन् मग अनैतिक संबंधांचा विळखा
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश लोटके आणि श्रद्धा यांचा पाच वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांचा एक लहान मुलगाही आहे. सुरुवातीला सुखाचा वाटणारा हा संसार गेल्या काही काळापासून विस्कळीत झाला होता. अविनाश एका गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर घरपोच देण्याचे काम करत असताना त्याची ओळख एका तृतीयपंथी व्यक्तीशी झाली. ही मैत्री इतकी वाढली की अविनाशला त्या व्यक्तीचा लळा लागला आणि त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले.
संशय आणि वादाची ठिणगी
अविनाश आपला वेळ आणि कष्टाचे पैसे त्या तृतीयपंथी व्यक्तीवर खर्च करू लागला होता. ही बाब जेव्हा पत्नी श्रद्धाला समजली, तेव्हा त्यांच्या संसारात वादळ उठले. श्रद्धाने या अनैतिक संबंधांना कडाडून विरोध केला. या वादाला दुसरी बाजू म्हणजे अविनाश हा श्रद्धाच्या चारित्र्यावरही संशय घेऊ लागला होता. १३ एप्रिलच्या रात्री अष्टमीची यात्रा पाहून परतल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले.
एक तास मारहाण आणि क्रूर हत्या
रागाच्या भरात अविनाशने श्रद्धाला तब्बल एक तास बेदम मारहाण केली. रागाचा पारा इतका चढला की, त्याने घरातील लोखंडी रॉड उचलून श्रद्धाच्या मानेवर आणि डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने श्रद्धाचा जागीच मृत्यू झाला.
चिमुरड्याला मित्राकडे सोडून पळाला
हत्या केल्यानंतर आरोपी अविनाशने अत्यंत थंड डोक्याने पळ काढला. पहाटे चारच्या सुमारास तो आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन मित्र रोहित कोरडे याच्याकडे गेला. श्रद्धा घरातून कोणालाही न सांगता निघून गेली आहे, मी तिला शोधायला जातोय, तोपर्यंत मुलाला सांभाळ, अशी खोटी माहिती देऊन त्याने मुलाला तिथे सोडले आणि स्वतःचा मोबाईल घरातच ठेवून तो फरार झाला.
खिडकीतून दिसला रक्ताचा सडा
सकाळी उशिरापर्यंत अविनाश मुलाला न्यायला न आल्याने रोहितला संशय आला. त्याने अविनाशचे घर गाठले आणि खिडकीतून आत डोकावले असता, फरशीवर रक्ताचा सडा आणि श्रद्धाचा मृतदेह दिसला. रोहितने तात्काळ घरमालक आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
विट्यात तृतीयपंथीयाची आत्महत्या; योगायोग की कनेक्शन?
धक्कादायक बाब म्हणजे, श्रद्धाच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी विटा परिसरातील एका तृतीयपंथी व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सध्या विटा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी अविनाश लोटके याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.