राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा बाजार समितीत!

By Admin | Updated: December 23, 2016 23:44 IST2016-12-23T23:44:36+5:302016-12-23T23:44:36+5:30

सत्ताधारी वरमले : घोरपडेसमर्थक संचालक आक्रमक

Rajaram Bapu's picture again in market committee! | राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा बाजार समितीत!

राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा बाजार समितीत!

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी गटात बेबनाव अजूनही कायम आहे. बाजार समितीच्या दर्शनी भागातील तैलचित्रांमधील लोकनेते राजारामबापू पाटील यांचे छायाचित्र काढून, त्या जागेवर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे छायाचित्र लावून सत्ताधाऱ्यांनी कुरघोडी केली होती. यावर घोरपडे समर्थक संचालकांनी आक्रमक भूमिका घेताच सत्ताधारी वरमले. त्यांनी वसंतदादा, पतंगराव कदम यांच्यासह राजारामबापूंच्या चित्राचा पुन्हा समावेश केला आहे.
बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या दर्शनी भागात वसंतदादा पाटील यांच्यासह लोकनेते राजारामबापू पाटील यांचे छायाचित्र असलेले तैलचित्र लावण्यात आले होते. २००८ मध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता मिळविल्यानंतर वसंतदादांबरोबर राजारामबापूंच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आला होता. गेल्या महिन्यात झालेल्या पदाधिकारी निवडीत सत्ताधारी गटातीलच अजितराव घोरपडे, विशाल पाटील गटाला पूर्णपणे वगळून कदम गटाने बाजी मारली होती. त्यांना मदन पाटील गटाने पूर्ण साथ दिली होती.
गेल्या आठवड्यात बाजार समितीतील दर्शनी भागातील तैलचित्रातील राजारामबापूंचे छायाचित्र काढून त्याऐवजी पतंगराव कदम यांचे छायाचित्र लावण्यात आले होते. सभापती दालनातील तैलचित्रातही कदम यांचा समावेश करण्यात आला होता. याबाबत संचालक मंडळात जोरदार चर्चा असतानाच, बुधवारी बैठकीच्या निमित्ताने समितीत आलेल्या घोरपडे समर्थक संचालक दीपक शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी, पतंगराव कदम यांच्या छायाचित्राला विरोध नाही, मात्र राजारामबापूंचे छायाचित्र हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तातडीने वसंतदादा, कदम यांच्याबरोबरच राजारामबापूंचे छायाचित्र पुन्हा लावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)


जयंत पाटील गटाच्या संचालकांचे दुर्लक्ष
बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पॅनेलमधून वसंतराव गायकवाड व दिनकर पाटील हे मदन पाटील समर्थक संचालक निवडून आले आहेत. त्यांनी बाजार समितीतील राजारामबापूंचे छायाचित्र हलविण्यात आल्यावरून आवाज उठविणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संचालक दीपक शिंदे यांनी केला. जिल्ह्याला विकासाची दिशा देणाऱ्या वसंतदादा, राजारामबापूंसारख्या नेत्यांच्या छायाचित्राला कोणाचा विरोध असू नये. माजी मंत्री पतंगराव कदम आमच्या गटाचे नेते असल्याने त्यांच्या छायाचित्राला विरोध नाही. मात्र, राजारामबापूंचे छायाचित्र काढू देणार नाही, अशी भूमिका शिंदे यांनी व्यक्त केली.

Web Title: Rajaram Bapu's picture again in market committee!