शिराळ्यात चक्रीवादळाच्या नुकसानीचे केवळ पंचनामे नकाेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:00+5:302021-06-09T04:34:00+5:30

शिराळा : चक्रीवादळामुळे शिराळा औद्योगिक वसाहत आणि भटवाडी, करमाळे येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; परंतु फक्त पंचनामे करून ...

Not only panchnama of cyclone damage in Shirala | शिराळ्यात चक्रीवादळाच्या नुकसानीचे केवळ पंचनामे नकाेत

शिराळ्यात चक्रीवादळाच्या नुकसानीचे केवळ पंचनामे नकाेत

शिराळा : चक्रीवादळामुळे शिराळा औद्योगिक वसाहत आणि भटवाडी, करमाळे येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; परंतु फक्त पंचनामे करून चालणार नाही, तर त्यांना भरीव नुकसानभरपाई मिळायला पाहिजे, अशी मागणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली. ते शिराळा येथे चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले होते.

शेट्टी म्हणाले, शिराळा औद्योगिक वसाहत येथे झालेल्या चक्रीवादळात कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे पत्रे उडून गेले आहेत. करमाळे, भटवाडी येथील अनेक कुटुंबांच्या राहत्या घराचे छत उडून गेले. शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बांध फुटून शेतातील माती वाहून गेली. नुकसानग्रस्त उद्योजक आणि कुटुंबांना भरघोस नुकसानभरपाई मिळायला पाहिजे.

ते म्हणाले, तहसील कार्यालयामार्फत पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र केवळ पंचनामे करून उपयोग नाही. त्या पंचनाम्याची अंमलबजावणी करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या संदर्भात मी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना भेटून पाठपुरावा करणार आहे. तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधणार आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे राम पाटील, एस. यू. संदे, मानसिंग पाटील, ॲड. रवी पाटील, रणजित चव्हाण, युवराज चव्हाण, आदी उपस्थित होते.

Web Title: Not only panchnama of cyclone damage in Shirala