इस्लामपुरात नो मास्क, नो एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:41+5:302021-03-08T04:25:41+5:30

इस्लामपुरात एन्ट्री करणाऱ्या दुचाकीस्वारांचे तपासणी करणाऱ्या पोलिसांचा ताफा लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवे तालुक्यात कोरोना रुग्णांची ...

No mask, no entry in Islampur | इस्लामपुरात नो मास्क, नो एंट्री

इस्लामपुरात नो मास्क, नो एंट्री

इस्लामपुरात एन्ट्री करणाऱ्या दुचाकीस्वारांचे तपासणी करणाऱ्या पोलिसांचा ताफा

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूर शहरासह वाळवे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या संथगतीने वाढत आहे. त्यामुळे पोलीस आणि शहर वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे ‘नो मास्क, नो एंट्री’यासाठी कडक मोहीम आखली आहे. सरासरी रोज ५० ते ६० दुचाकीस्वारावर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई केली जात आहे.

फेब्रुवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यापासून इस्लामपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाची संख्या संथपणे वाढत आहे तर शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची मोहीमही राबविली जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी इस्लामपूर पोलिसांनी कडक मोहीम राबविली आहे. शहरातील आष्टा नाका, गांधी चौक, ताकारी रोड, पेठ रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरात एन्ट्री करणाऱ्या दुचाकीस्वारांची कसून चौकशी केली जात आहे. विनामास्क दुचाकीस्वारास २०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून जनजागृती होऊ लागली आहे. शहरात रविवारी आणि गुरुवारी या दोन दिवशी आठवडी बाजार भरतो. त्या परिसरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला आहे. याठिकाणी पोलीस यंत्रणा कमी असल्याने वाहतूक कोंडीही होते. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. बाजारातील गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुुर्भाव होण्याची शक्यता आहे.

कोट

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्यात जनजागृती झाल्याचे दिसते. विशेषत: महिलावर्ग मास्क घालूनच घराबाहेर पडतात; परंतु युवावर्गातून मास्कचे उल्लंघन होते. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते.

-नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक, इस्लामपूर

कोट

शहर वाहतूक पोलिसांकडून विना मास्क दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. रोज सरासरी २० ते २५ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मास्क न लावणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मास्क न वापरण्याचे प्रमाण पादचाऱ्यांच्यात आहे. त्यांच्यावरही कारवाई करणे गरजेचे आहे.

- अशोक जाधव, वाहतूक पोलीस उपनिरीक्षक, इस्लामपूूर

Web Title: No mask, no entry in Islampur