Sangli Crime: धुळगावला किराणा दुकानदार तरुणाचा खून, चौघे संशयित ताब्यात; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:53 IST2025-11-27T13:53:24+5:302025-11-27T13:53:43+5:30
काठी व अन्य शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला

Sangli Crime: धुळगावला किराणा दुकानदार तरुणाचा खून, चौघे संशयित ताब्यात; कारण अस्पष्ट
तासगाव : तासगाव तालुक्यातील धुळगाव येथील राजू गौतम खांडे (वय ४०) यांचा चौघांनी काठी व अन्य शस्त्रांनी वार करून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सांबरवाडी–धुळगाव रस्त्यावर असलेल्या पुलावर घडली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रात्री उशिरा चार संशयितांना ताब्यात घेतले.
राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा मालाचे दुकान आहे. दुकान चालवण्याबरोबरच दुपारनंतर ते वडिलांसोबत गवंडीकाम करत असत. बुधवारी दुकान बंद करून किराणा साहित्य खरेदीसाठी ते बाहेरगावी गेल्यानंतर सांबरवाडीमार्गे धुळगावकडे परतताना पुलावर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तासगावचे पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे तत्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि उपाधीक्षक अशोक भवड यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक शेवाळे यांनी दिली. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील हेतू काय, कसून तपास सुरू आहे.