खानापूर तालुक्यात लॉकडाऊन संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:11+5:302021-04-09T04:28:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या मिनी लॉकडाऊनला खानापूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. विटा ...

Lockdown composite response in Khanapur taluka | खानापूर तालुक्यात लॉकडाऊन संमिश्र प्रतिसाद

खानापूर तालुक्यात लॉकडाऊन संमिश्र प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या मिनी लॉकडाऊनला खानापूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. विटा व खानापूर शहर वगळता तालुक्याच्या ग्रामीण भागात लॉकडाऊनचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’चा आदेश काढला असला तरी नागरिकांची गर्दी काही हटत नसल्याने कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

खानापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या पुढे आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने मिनी लॉकडाऊन लावला आहे.

शासनाने मिनी लॉकडाऊनचा आदेश काढल्यानंतरही विटा शहर व तालुक्यात सर्वत्र बाजारपेठेतील व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. विट्यात पोलीस, महसूल व नगरपालिका प्रशासनाला रस्त्यावर उतरून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद करावी लागली. व्यापारी संतप्त झालेच, शिवाय नागरिकांत संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याचाच भाग म्हणून विट्यात बुधवारी व्यापाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करीत प्रशासनाला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला.

दरम्यान, हा मिनी लॉकडाऊन केवळ विटा शहर व खानापूर नगरपंचायत हद्दीपुरताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. कारण लेंगरे, आळसंद, भाळवणी, पारे, माहुली यासह अन्य ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहार आजही सुरळीत सुरू आहेत. विटा शहरात अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार बंद आहे. या लॉकडाऊनच्या विरोधात आता नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. व्यापारी बाजारपेठ सुरळीत सुरू करून नियमांचे कडक पालन करीत आम्ही व्यवसाय सुरू ठेवतो अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. मात्र, शासनाने लॉकडाऊन मागे घेऊन काही प्रमाणात निर्बंध घालून द्यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.

चौकट

व्यापाऱ्यांवर लादलेला लॉकडाऊन

विटा शहरात पाच दिवस अगोदर कल्पना देऊन लॉकडाऊन केला असता तर व्यापाऱ्यांचे नुकसान झाले नसते. आम्हीही कोरोनाबाबत काळजी घेत असतो. परंतु, प्रशासनाने पोलिसांना सोबत घेऊन अचानक बाजारपेठ बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर लॉकडाऊन लादला आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे.

- भरत मुळीक, माजी अध्यक्ष

विटा सराफ असोसिएशन.

Web Title: Lockdown composite response in Khanapur taluka