कोयना, वारणा धरण व्यवस्थापनाचे पाणी साठ्याकडे दुर्लक्ष, महापूर विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:14 IST2025-07-17T12:14:09+5:302025-07-17T12:14:35+5:30
पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती

कोयना, वारणा धरण व्यवस्थापनाचे पाणी साठ्याकडे दुर्लक्ष, महापूर विरोधी कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सांगली : कोयना, राधानगरी, चांदोली या धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. धरणातीलपाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने नियमावली केली आहे. या नियमाचा एकाही धरण व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली नाही. कोयना आणि वारणा धरण व्यवस्थापनाला केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार जुलैपर्यंत ५० टक्केच पाणीसाठा ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना द्यावी, अशी मागणी महापूर विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे बुधवारी केली.
महापूर विरोधी कृती समितीतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, सद्य:स्थितीत सर्वत्र पाऊस सुरू आहे. सांगली शहर, कृष्णाकाठचा सर्व परिसर हा कृष्णा नदीच्या पूरपात्रात येतो. महापुराचे गंभीर सावट यावर्षी जाणवत आहे. आतापर्यंत आलेल्या पुराचे कारण म्हणजे कोयना धरणातील पाणीसाठा हा क्षमतेपेक्षा जास्त ठेवल्याचे आहे. दि. १५ जुलै रोजी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचा कोयना धरण व्यवस्थापनाने भंग केलेला आहे. जुलै २०२५ पर्यंत केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वाने सर्व धरणांसाठी ५० टक्के इतकाच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.
सध्या कोयना, राधानगरी, वारणा धरणामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा ठेवला आहे. येत्या काही दिवसात पाऊस वाढल्यास कोयना धरणातून व्यवस्थापनास प्रति सेकंद एक लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागेल. त्यामुळे सर्वत्र कृष्णा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होईल. जिल्हाधिकारी यांनी पाटबंधारे विभागाला धरण पाणीपातळी तातडीने केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे जुलैला ५० टक्केपर्यंतच पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार आतापासूनच धरणातून विसर्ग वाढवावा. यामुळे भविष्यात होणारी वित्त व जीवित हानी टाळणे शक्य आहे.
यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, महापूर विरोधी कृती समितीचे मनोज साळुंखे, रणजित जाधव, संतोष कोळेकर, राहुल चौगुले, संदीप खोत, रुस्तुम पटेल, सुभाष कोळेकर, रोहित चौगुले आदी उपस्थित होते.
केंद्रीय जल आयोगाकडेही तक्रार : सर्जेराव पाटील
पश्चिम महाराष्ट्रातील धरणामध्ये ७५ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा जुलैमध्येच ठेवला आहे. या पाणीसाठ्यामुळे भविष्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून केंद्रीय जल आयोगाने तातडीने सर्वच धरण व्यवस्थापन विभागाला पाणीसाठा नियमानुसार ठेवण्याची सूचना द्यावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय जल आयोगाकडे पाठविले आहे, असेही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी सांगितले.