पाणी परवान्यासाठी कऱ्हाडला हेलपाटे

By Admin | Updated: February 2, 2015 23:42 IST2015-02-02T23:20:09+5:302015-02-02T23:42:36+5:30

पाटबंधारे खात्याचा कारभार : दुष्काळी भागातून विरोध, शेतकऱ्यांचे हाल

Karhad helicopter for water license | पाणी परवान्यासाठी कऱ्हाडला हेलपाटे

पाणी परवान्यासाठी कऱ्हाडला हेलपाटे

रजाअली पीरजादे - शाळगाव -दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आता कऱ्हाडला हेलपाटे मारावे लागणार आहेत. दुष्काळी भागातील सांगोला, आटपाडी, खानापूर, तासगाव तालुक्यातील तलाव, नदी, नाले ओढ्यावरील पाणी परवाने आणि इतर परवाने देण्याचे काम पाटबंधारे खात्याने कऱ्हाड, ओगलेवाडी येथील टेंभू कार्यालयाकडे १ जानेवारीपासून वर्ग केले आहेत. त्यामुळे आता टेंभू योजनेअंतर्गत आणि तलाव, नदी, नाले, ओढे यांचे कडेगावपासून सांगोल्यापर्यंतचे पाणी परवाने, ना-हरकत परवाने आणि इतर परवान्यांसाठी आता कऱ्हाड, ओगलेवाडी येथील टेंभू कार्यालयाकडे लोकांना हेलपाटे मारावे लागणार आहेत.
यापूर्वी हे परवाने सांगली, तासगाव आणि विटा येथून लोकांना मिळत होते. परंतु आता टेंभू योजना सुरू झाल्याने आणि त्याचे पाणी आता कडेगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यांना मिळू लागल्याने आणि हे पाणी सांगोला तालुक्याला काही दिवसांनी मिळणार असल्याने टेंभूने पाणी ज्या गावांना मिळणार आहे, अशा सर्व गावांचा एकत्रितपणे मसुदा तयार करून एकाच छत्राखाली किंवा कार्यालयाखाली आणण्याच्या दृष्टीने शासनाने सर्व कारभार आता टेंभू योजनेच्या कऱ्हाड येथील ओगलेवाडी कार्यालयाकडे १ जानेवारीपासून वर्ग केला आहे.
शासनाच्या या धोरणानुसार कोणताही पाटबंधारे तलाव, नदी, नाले, ओढ्यासाठी पाणी उपसा परवाना, ना-हरकत प्रमाणत्र, बिगरशेती प्रमाणपत्र अशी कामे आता कऱ्हाड ओगलेवाडी येथील टेंभू योजनेच्या कार्यालयामार्फत केली जाणार आहेत. याची अधिकृत कार्यवाही १ एप्रिलपासून सरू होणार आहे. या गोष्टीला दुष्काळी तालुक्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे.
याबाबत टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता तानाजी जेंगटे म्हणाले की, शासनाने टेभू योजनेचे पाणी ज्या ज्या गावांना मिळते, त्या सर्व गावांसाठी एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यादृष्टीने टेभू सिंचन प्रकल्प ओगलेवाडी कार्यालयाकडे हे काम वर्ग केले आहे. परंतु शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना तालुक्यातूनच पाणी परवाना आणि अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत.

Web Title: Karhad helicopter for water license