सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा
By संतोष कनमुसे | Updated: March 18, 2026 14:41 IST2026-03-18T14:36:03+5:302026-03-18T14:41:41+5:30
सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता पाटील जिल्हा परिषेदच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

सांगलीत जयंत पाटलांनी पुन्हा एकदा केला 'करेक्ट कार्यक्रम'! भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषदेवर मविआचा झेंडा
सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचाच अध्यक्ष होणार असा दावा केला होता. दरम्यान, आता अध्यक्षपदाच्या निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील विजयी झाल्या आहेत.
"प्रेम आमच्याशी अन् लग्न मोदींशी"; खर्गे यांनी देवेगौडांना चिमटा काढताच PM मोदींनाही हसू आवरले नाही
भाजप युतीच्या शीतल बाबर आणि आघाडीच्या प्रतिमा मोरे यांची अध्यक्षपदाच्या लढतीतून माघार घेतली. भाजपच्या स्वप्नाली मासाळ व आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये संगीता पाटील यांचा मोठा विजय झाला. संगीता पाटील यांना ३४ मते मिळाली. तर स्वप्नाली मासाळ यांना २४ मते मिळाली आहेत. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांची रणनिती यशस्वी ठरली आहे.
उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांचा दणदणीत विजय
सांगलीजिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे ऋषिकेश लाड यांनी बाजी मारली आहे. लाड यांनी भाजप-युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव करत उपाध्यक्षपदावर आपले नाव कोरले. या निवडणुकीत ऋषिकेश लाड यांना ३४ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार हिम्मत जाधव यांना केवळ २५ मतांवर समाधान मानावे लागले. अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदावरही महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आघाडीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शिंदे सेनेचे दोन सदस्य गैरहजर
या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे दोन सदस्य, जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील, मतदानाला गैरहजर राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप-युतीसाठी हे दोन सदस्य महत्त्वाचे मानले जात होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीच्या मतांचे गणित बिघडले. महाविकास आघाडीने आपल्या मतांची गोळाबेरीज व्यवस्थित केल्यामुळे ऋषिकेश लाड यांचा विजय सुकर झाला. शिंदे सेनेच्या सदस्यांच्या गैरहजेरीमुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, याचा फटका भाजपला बसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कालच झाली होती बैठक
निवडीची प्रक्रिया अवघ्या एका दिवस आधी मंगळवारी आघाडीच्या नेत्यांची सांगलीत बैठक झाली. त्यामध्ये निवडीची प्रक्रिया, मतदान, व्हीप काढणे आदी प्रक्रियेवर चर्चा झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतिपदांची नावे जवळजवळ निश्चित झाली होती. महाविकास आघाडीचे नेते फक्त भाजपाच्या डावपेचांवर लक्ष ठेवून होते.