Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:32 IST2025-10-10T18:31:00+5:302025-10-10T18:32:23+5:30
देवस्थानसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत

Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण
सांगली : माझ्या आई-वडिलांबद्दल वाईट बोललेलं जिल्ह्यातील लोकांना आवडलं नाही. योग्य वेळ येईल त्यावेळी त्यावर बोलू, पण सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी इशारा दिला.
पडळकर यांच्यावरील टीकेबद्दल जयंत पाटील यांनी प्रथमच भाष्य केले. इस्लामपूर येथे त्यांची गुरुवारी मुलाखत पार पडली. यावेळी ते म्हणाले की, एखाद्याच्या आई-वडिलांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी सभा घेतली जाते. भाजपला हे कसे मान्य आहे, याचे आश्चर्य वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना काय समज दिली हा प्रश्न आहे. आमच्या सभेत दोन-चारजणांनी चुकीची टीका केली. आम्ही त्याचे समर्थन करीत नाही, पण आमच्या भागातील जनतेला ही टीका आवडली नाही, पण आम्ही निवडणुकीतून याचे उत्तर देऊ.
भाजपच्या काही नेत्यांनी माझ्याशी संबंधित संस्थांच्या चौकशीचा इशारा दिला. त्यांनी खुशाल चौकशी करावी. मी त्याला घाबरत नाही. ते का थांबलेत? मला सत्तेत जावेसे कधीच वाटले नाही. माझा विचार काय हे जनतेला माहिती आहे. सत्तेसाठी पक्ष सोडणे हे लोकांना पटत नाही. मलाही पटत नाही.
आमच्यात वाद नाहीत
काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याशी माझे कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्रित काम करीत आहोत. निवडणुकीतही एकसंधपणे काम करू. बाहेर लोक आमच्याबाबत काय चर्चा करतात, याकडे लक्ष देत नाही.
देवस्थानसाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांसाठी नाहीत
महापुरासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकार अपयशी ठरले असून, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार यांना लोकांचे प्रश्न सोडवणे जमत नसेल तर त्यांनी बाजूला झाले पाहिजे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली. 'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्याचे कर्ज ९ लाख ५० हजार कोटींवर गेले असून, राज्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर लाखाच्या वर कर्ज आहे. देवस्थान जोडण्यासाठी १ लाख कोटी खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत, पण पूरग्रस्तांना मदत द्यायला पैसे नाहीत, ही शोकांतिका आहे, असे ते म्हणाले.
'व्होटचोरी झालीच आहे!'
भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी, भाजपने कुणाची कसलीही पार्श्वभूमी न पाहता सगळ्यांसाठी दार उघड ठेवले आहे, अशी टीका केली. निवडणूक आयोग अपारदर्शक कामकाज करत असून, 'व्होटचोरी झालीच आहे, यात शंकाच नाही,' असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अजित पवारांची ती टीका योग्य नाही
अजित पवार यांच्या संबंधांबद्दल विचारले असता, पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याबद्दल माझे मत चांगले आहे, ते राजकारणात खूप कष्ट करतात. मात्र, निवडणुकीत त्यांनी राजारामबापू कारखान्याच्या दरावरून केलेली टीका योग्य नाही. एफआरपीनुसार कारखाना दर देतो, हा विषय वेगळा असून, तो खासगी मालमत्ता नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
'हिंदुत्वात अहंकार नको'
आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी नव्या पिढीला आपले मूळ विसरायला नको, असा सल्ला दिला. "हिंदुत्वात शूरपणा हवा. अहंकार आणि दमदाटी नसावी. हिंदुत्वावर मते मागणे भारतात फार काळ चालणार नाही, असे ते म्हणाले.