Sangli News: चमत्कारकच!, डोक्यामध्ये दगड घातला, रेल्वे अंगावरून गेली; तरी तरुण वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:52 IST2025-12-01T18:49:54+5:302025-12-01T18:52:53+5:30
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चार मित्रांना अटक

संग्रहित छाया
मिरज : किरकोळ वादातून चार मित्रांनी एका तरुणाला मारहाण करून बेशुद्धावस्थेत रेल्वे रुळावर टाकून पलायन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूररेल्वे स्थानकालगत घडली आहे. अंगावरून रेल्वे गेल्याने हात पाय तुटले, तरीही चमत्कारिकरीत्या तरुणाचा जीव वाचला याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
तेजस अनिल जाधव (वय २४, रा. गणपती मंदिर, हिराई निवास, कोल्हापूर) याचा जीव आश्चर्यकारकरीत्या वाचला. जखमी तेजस फिर्यादीवरून सागर राजू शेलार, अर्जुन संजय मोरे, आर्यन संजय शेलार व मिलिंद भागोजी गावडे (सर्व रा. शहाजी गंज झोपडपट्टी, कोल्हापूर) या चार मित्रांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
तेजस हा कोल्हापुरात सांगली फाट्यावर हमाली करतो व त्याचे मित्र मजुरी करतात. तेजस याने दि. १८ रोजी मोबाइल खरेदी केला होता. त्याचदिवशी रात्री साडेदहा वाजता तो चार मित्रांसोबत कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गजवळ बसून दारू पित होता. नवीन फोन वॉटरप्रूफ असल्याचे दाखविण्यासाठी त्याने त्यावर पाणी ओतले. उरलेले पाणी त्याने चेष्टेने मित्रांच्या अंगावर फेकले, यावरून त्याच्यात वाद झाला.
दारुच्या नशेत बेदम मारहाण
दारूच्या नशेत असलेल्या चारही मित्रांनी रागाच्या भरात तेजसला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. यामुळे तो बेशुद्ध पडल्यानंतर तेजसला रुळावर झोपवून तेथून पलायन केले. अंधारात त्या रुळावरून एक रेल्वे गाडी गेल्याने त्याचा उजवा पाय व डावा हात तुटला, तरीही त्याचा जीव वाचला.