‘अन्न व औषध’कडून निव्वळ कारवाईचा फार्सच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST2021-09-03T04:26:21+5:302021-09-03T04:26:21+5:30

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुटखा विक्रीचे वाढतच चाललेले रॅकेट आणि भेसळखोरांची मजल वाढतच चालली असतानाही, अन्न व औषध ...

Farce from ‘Food and Drug’ net action! | ‘अन्न व औषध’कडून निव्वळ कारवाईचा फार्सच!

‘अन्न व औषध’कडून निव्वळ कारवाईचा फार्सच!

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुटखा विक्रीचे वाढतच चाललेले रॅकेट आणि भेसळखोरांची मजल वाढतच चालली असतानाही, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ दूध डेअऱ्यांवर कारवाई करत कारवाई केल्याची पाठ धोपटून घेण्यात प्रशासन धन्यता मानत असल्याने बंदी असूनही नियमाला बासनात गुंडाळणारे मोकाटच आहेत.

जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, ढाबे, खाद्यपदार्थ पुरविणारे यंत्रणासह बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू, मावा, गुटख्याच्या विक्रीवर अंकुश ठेवण्याचे काम अन्न व औषध प्रशासन विभागाचे असते. कोरोना संसर्गाचे कारण पुढे करुन गेल्या दीड वर्षांपासून या कारवाया थंडावल्या असल्या तरी केवळ आपण काहीतरी करतो, हे वरीष्ठांना दाखविण्यासाठी महिन्यात एखादी कारवाई केली जात आहे.

बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू, गुटख्याचा आजही सर्वत्र मुबलक साठा मिळून येतो. सीमावर्ती भागात मजबूत असलेल्या रॅकेटकडून हा माल जिल्हयात आणला जातो. मिरज पूर्वभागातील अनेक गावांत राजरोसपणे या मालाची वाहतूक होत असते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

जी कारवाई अन्न व औषधकडून अपेक्षित हाेती ती कारवाई मिरज पोलिसांनी केली होती. गेल्यावर्षी बेडगजवळ कर्नाटकातून येणारा गुटखा साठा जप्त करत गुटख्याचा कंटेनरच जप्त केला होता. कंटेनरसह गुटख्याची किंमत एक कोटीच्या घरात होती. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी ही कारवाई केली होती. इतका कोट्यवधी रुपयांचा माल जिल्ह्यात येत असतानाही अन्न व औषधकडून करण्यात येत असलेल्या कारवाया हजारांच्या पुढे जायला तयार नाहीत.

Web Title: Farce from ‘Food and Drug’ net action!