सांगलीत एल्गार! शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वाळव्यात शेतकऱ्यांची भव्य बाईक रॅली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:36 IST2026-05-14T12:35:43+5:302026-05-14T12:36:13+5:30
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पवित्र स्मृतींना अभिवादन करूनच शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या लढाईला सुरुवात केली.

सांगलीत एल्गार! शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वाळव्यात शेतकऱ्यांची भव्य बाईक रॅली
सांगली : राज्य सरकारच्या प्रस्तावित 'शक्तिपीठ महामार्गा'विरोधात सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. वाळवा तालुका संघर्ष समिती आणि बाधित शेतकऱ्यांच्या वतीने या महामार्गाला विरोध करण्यासाठी आज (गुरुवारी) एक भव्य बाईक रॅली काढण्यात आली. "आमच्या सुपीक जमिनी देणार नाही," असा आक्रमक पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीनिमित्त वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी चौकात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पवित्र स्मृतींना अभिवादन करूनच शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या लढाईला सुरुवात केली.
बाधित गावांचा उत्स्फूर्त सहभाग
शक्तिपीठ महामार्गामुळे जमिनी जाणाऱ्या गावांमधील शेतकरी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मसुचीवाडी, जुनेखेड,नवेखेड, वाळवा, कामेरी, येडेनिपाणी, येलूर, इटकरे, ऐतवडे खुर्द, कुरळप या गावातील शेतकरी हातात झेंडे आणि महामार्ग विरोधाचे फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मृतिभूमीस अभिवादन करून ही रॅली इस्लामपूरच्या दिशेने रवाना झाली.
रॅलीदरम्यान बोलताना कॉम्रेड धनाजी गुरव यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "सध्याचे सरकार आणि राज्यकर्ते हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून त्यांच्या विरोधात निर्णय घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी रयतेची आणि शेतकऱ्यांची काळजी घेण्याची शिकवण दिली आहे. त्याच विचारांचा वारसा चालवत आम्ही कोणत्याही परिस्थितीत सुपीक जमिनीतून शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही."
शेतकऱ्यांचा निर्धार
या महामार्गामुळे बागायत जमिनींचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.