ई-पीक पाहणीला १५ दिवसांच्या मुदतवाढीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:02+5:302021-09-14T04:32:02+5:30

सांगली : ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना पीक नोंदीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे विभागीय जमाबंदी आयुक्तांनी तशी ...

Decision to extend e-crop inspection for 15 days | ई-पीक पाहणीला १५ दिवसांच्या मुदतवाढीचा निर्णय

ई-पीक पाहणीला १५ दिवसांच्या मुदतवाढीचा निर्णय

सांगली : ई-पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना पीक नोंदीसाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे विभागीय जमाबंदी आयुक्तांनी तशी सूचना जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षकांना दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ई-पीक पाहणी ॲप वापरून शेतकरी आपल्या पिकाच्या नोंदी सातबाऱ्यावर स्वत:च करू शकतात. त्यासाठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशी मुदत होती. १६ ते ३० सप्टेंबर या पंधरवड्यात तलाठी स्तरावरील पीकपाहणी केली जाणार होती. शेतकऱ्यांकडून या नोंदणीला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. सांगली जिल्ह्यात महिन्याभरात सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनीच ऑनलाईन पीक नोंदणी केली आहे. जिल्ह्याची खातेदार संख्या सुमारे पाच लाख असताना ही अत्यल्प नोंदणी झाली. अन्य जिल्ह्यांतही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. ॲप वापरातील तांत्रिक अडचणी, शेतात नोंदणी करताना नेटवर्कचा अभाव, नोंदणीतील क्लिष्टता अशा कारणांनी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसावा. हे लक्षात घेऊन मुदतवाढीचा निर्णय झाला. त्यानुसार शेतकऱ्यांना आता ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येईल. तलाठ्यांची पीक पाहणी ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान चालेल.

Web Title: Decision to extend e-crop inspection for 15 days