अवैध धंदे बंदसाठी दलित महासंघाचे तासगावात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:15+5:302021-08-27T04:29:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : महाराष्ट्रातील डान्सबार, मटका, सावकारकी यांसारख्या अवैध धंद्यांना मोडीत काढून सर्वसामान्यांच्या कुटुंबांना अभय देणारे माजी ...

Dalit Federation's agitation in Tasgaon for closure of illegal trades | अवैध धंदे बंदसाठी दलित महासंघाचे तासगावात धरणे आंदोलन

अवैध धंदे बंदसाठी दलित महासंघाचे तासगावात धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : महाराष्ट्रातील डान्सबार, मटका, सावकारकी यांसारख्या अवैध धंद्यांना मोडीत काढून सर्वसामान्यांच्या कुटुंबांना अभय देणारे माजी स्व.गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांचा विसर तासगाव पोलिसांना पडला आहे. परिणामी, तासगावात अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. येत्या काळात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत, अन्यथा तासगाव पोलीस ठाण्यावर महासंघाच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा तालुका अध्यक्ष प्रशांत केदार यांनी बेमुदत धरणे प्रसंगी दिला.

तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत. या मागणीसाठी प्रशांत केदार यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध मटका, गुटखा, गांजा, दारू यासारखे अवैध व्यवसाय राजरोस सुरू आहेत. हे व्यवसाय शाळा परिसर, वाचनालय, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सुरू आहेत.

याचा सामान्य नागरिकासह, महिला, युवतींना त्रास होत आहे. अनेक गोरगरीब महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सुशिक्षित तरुण अवैध व्यवसायाच्या विळख्यात सापडले आहेत. व्यवसायात्मक स्पर्धेतून गुन्हेगारी जगताचा उदय होत आहे.

याबाबत दलित महासंघाने पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदने देत चर्चा केली आहे. तरी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवैध धंदे चालूच आहेत. तेव्हा अवैध धंदे बंद न झाल्यास तासगाव पोलीस ठाण्यावर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी आंदोलनास भूमाता ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष मीनाक्षी शिंदे, मनसे महिला आघाडी तालुका अध्यक्ष दीपाली पुंडकर, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अमोल कदम, मेंढपाळ आर्मीचे अर्जुन थोरात, यशवंत सेनेचे तालुका अध्यक्ष राजू ढाले, सामाजिक कार्यकर्ते अमित देव यांच्यासह विविध पक्ष, पदाधिकारी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

Web Title: Dalit Federation's agitation in Tasgaon for closure of illegal trades