कारागृह विभागात नोकरीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक; शिराळा, कोल्हापुरातील ठकसेनांची करामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:55 IST2026-01-15T19:54:44+5:302026-01-15T19:55:03+5:30
ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदाची सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कापूरवाडी-पेठ (ता.वाळवा) येथील एकाची चौघांच्या टोळीने १३ ...

कारागृह विभागात नोकरीच्या आमिषाने १३ लाखांची फसवणूक; शिराळा, कोल्हापुरातील ठकसेनांची करामत
ईश्वरपूर : कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक पदाची सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवत कापूरवाडी-पेठ (ता.वाळवा) येथील एकाची चौघांच्या टोळीने १३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ मध्ये घडला.
याबाबत अर्जुन अण्णासाहेब देशमुख (वय ५३,रा.विष्णूनगर,कापूरवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाजीराव जोती पाटील (रा.वाडीभाग,शिराळा), गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव, मनीषा गणेश जाधव (तिघे रा.पाचगाव-कोल्हापूर) अशा चौघांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील चौघांनी संगनमत करत अर्जुन देशमुख यांचा मुलगा नेताजी याला कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक या पदावर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी बाजीराव पाटील यांच्या सांगण्यावरून अर्जुन देशमुख यांनी पाचगावच्या जाधव कुटुंबाला वेळोवेळी १५ लाख १० हजार रूपये दिले होते. मात्र, देशमुख यांच्या मुलाला नोकरी न लागल्याने त्यांनी पैशासाठी तगादा लावल्यावर या ठकबाजांनी देशमुख यांना २ लाख रुपये परत केले. तसेच राहिलेली १३ लाख १० हजार रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यावर देशमुख यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या चौघांविरुद्ध पोलिसात धाव घेतली.