Sangli: चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मिळणार ४ कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:32 IST2025-04-19T16:31:50+5:302025-04-19T16:32:14+5:30
जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यास यश

Sangli: चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मिळणार ४ कोटींचा निधी
इस्लामपूर : राज्य शासनाच्या जनवन योजनेंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सोयी-सुविधा पूर्ण करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या वाळवा, शिराळा व मिरज तालुक्यातील १६ वसाहतींना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याने प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.
चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या मागणी व लढ्याला यश आल्याने सर्व वसाहतीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, ही माहिती तुंग (ता.मिरज) येथील चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते राम सावंत यांनी दिली.
ते म्हणाले, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त वसाहतीत मूलभूत सोयी-सुविधा करण्यासाठी हा निधी मिळाला आहे. जयंत पाटील व त्यांचे प्रकल्पग्रस्त कार्यकर्ते गेल्या २-३ वर्षांपासून हा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. कुपवाड (सांगली) येथील वनविभाग कार्यालयाकडे हा निधी मिळावा म्हणून लेखी अर्जाद्वारे मागणी केली होती.
त्याप्रमाणे सर्व वसाहतीत जनवन योजना समित्या स्थापन करून त्यांच्यामार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावामध्ये काही अडचणी व त्रुटी आल्या होत्या, त्या सर्व पूर्ण करण्यात आल्या. ज्ञानदेव पवार, शंकर लोखंडे, दीपक वाघमारे, लक्ष्मण सावंत, मारुती रेवले, बिरु येडगे, सुनील पाटील, चंद्रकांत सावंत, मिथुन पवार यांच्यासह चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांनी हा निधी मिळण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.