भाजपने गोळा केले कागदोपत्री पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:45+5:302021-03-07T04:23:45+5:30

सांगली : महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडीवेळी व्हीप बजाविल्यानंतरही पक्षविरोधात कृती केल्याबद्दल भाजपने सहा नगरसेवकांना पाठविलेल्या नोटिसांची पोहोच पक्षाला प्राप्त ...

BJP collected documentary evidence | भाजपने गोळा केले कागदोपत्री पुरावे

भाजपने गोळा केले कागदोपत्री पुरावे

सांगली : महापालिकेतील महापौर, उपमहापौर निवडीवेळी व्हीप बजाविल्यानंतरही पक्षविरोधात कृती केल्याबद्दल भाजपने सहा नगरसेवकांना पाठविलेल्या नोटिसांची पोहोच पक्षाला प्राप्त झाली आहे. एकाचेही म्हणणे अद्याप आलेले नाही. दुसरीकडे त्यांच्यावर कारवाईसाठी निवडणुकीच्या प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे महापालिकेतून भाजप अध्यक्षांनी मिळविली आहेत.

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी सांगितले की, भाजपच्यावतीने माहितीच्या अधिकारात महापालिकेकडून मतदान प्रक्रियेची सर्व कागदपत्रे मिळविली आहेत. कारवाई करताना ठोस पुराव्यांचा आधार घेतला जाणार असल्याने ही सर्व तयारी केली आहे. प्रक्रियेच्या संपूर्ण चित्रफितीची मागणी आम्ही महापालिकेकडे केली आहे. येत्या दोन दिवसात तीसुद्धा प्राप्त होईल. फुटलेल्या सहा सदस्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. त्यांना त्या प्राप्त झाल्याने त्याची पोहोचही मिळाली आहे. अद्याप एकाही सदस्याचे म्हणणे प्राप्त झालेले नाही. आठ दिवसांच्या दिलेल्या मुदतीपर्यंत आम्ही प्रतीक्षा करणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल.

महापौर, उपमहापौर निवडीवेळी भाजपचे महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक या चारजणांसह अपक्ष विजय घाडगे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केले, तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे दोघे गैरहजर राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा धक्कादायक पराभव झाला होता. भाजपच्यावतीने नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला होता. मात्र, पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले सहा व एक सहयोगी असे सात नगरसेवक फुटले. नगरसेवक विजय घाडगे यांना मात्र भाजपने नोटीस बजाविलेली नाही. घाडगे हे स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे घाडगे यांच्यावर कारवाई करण्यात भाजपला अडचणी आहेत. अन्य सहा नगरसेवकांवर मात्र कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.

म्हणणे आले नाही तर काय..?

पक्षाने दिलेल्या मुदतीत म्हणजे ८ मार्चपर्यंत कोणत्याही सदस्यांनी म्हणणे दिले नाही, तर त्यांना याबाबत काही म्हणायचे नाही, असे गृहीत धरून कारवाईस सुरुवात होईल. म्हणणे आले तर त्याचे अवलोकन होईल, असे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: BJP collected documentary evidence