ZP Election 2026: सांगलीत भाजपची वेगळी रणनीती; वाळव्यात युती, अन्यत्र स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:04 IST2026-01-22T19:02:27+5:302026-01-22T19:04:14+5:30
जयंत पाटील यांना लढत देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्षांशी युती केली

ZP Election 2026: सांगलीत भाजपची वेगळी रणनीती; वाळव्यात युती, अन्यत्र स्वबळाचा नारा
सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय समीकरण आखत उमेदवार जाहीर केले आहेत. वाळवा तालुक्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदेसेना आणि रयत क्रांती आघाडीशी युती करत सामूहिक लढतीचा मार्ग स्वीकारला आहे.
मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज आणि शिराळा तालुक्यातील कोकरुड या दोन महत्त्वाच्या जागा भाजपने जनसुराज्य पक्षाला सोडल्या आहेत. तर वाळवा आणि बावची हे दोन गट वैभव नायकवडी यांच्यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपने ६१ पैकी ५० जागांवर उमेदवारांची घोषणा केली.
आटपाडी तालुक्यातील निंबवडे गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजयी माधवी ब्रह्मानंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिली. कुंडल गटात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद लाड यांच्या पत्नी धनश्री यांना मैदानात उतरविले आहे.
वाचा: सांगली जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी विक्रमी १९०० अर्ज दाखल; आजी-माजी आमदारांचे नातेवाईक रिंगणात
वाळवा तालुक्यातील कामेरीतून सी. बी. पाटील यांचे चिरंजीव जयराज, येलूरमधून भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांचे बंधू राहुल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा, काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता यांना बेडग गटातून, माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक अरविंद तांबवेकर यांना समडोळी गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने ६१ पैकी ५० जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सभापती, लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना लढत देण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना, जनसुराज्य शक्ती पक्षांशी युती केली आहे. अजित पवार गटाला रेठरेहरणाक्षची जागा दिली आहे. तर जनसुराज्य पक्षाला कोकरूड, कसबेडिग्रज या दोन जागा, तर शिंदेसेनेला वाळवा व बावची तर रयत क्रांती आघाडीला बागणी गटाची जागा सोडली आहे.
खानापूर-आटपाडीत शिंदेसेना स्वबळावर
भाजपने वाळवा तालुक्यात शिंदेसेनेला सोबत घेतले असले तरी खानापूर व आटपाडी या दोन तालुक्यांत मात्र शिंदेसेना स्वबळावर लढणार आहे. तिथे भाजपनेही उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यात तिरंगी, चौरंगी लढत होणार आहे.
कवठेमहांकाळचा तिढा
कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, कुची, देशिंग व रांजणी या चार गटात भाजपने उमेदवार दिलेले नाहीत. तसेच कवठेपिरान गटातही भाजपचे उमेदवार नाहीत. त्या ठिकाणी भाजपची युती कोणाशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बोरगावमध्ये अपक्ष?
वाळवा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद गट भाजपने आघाडीसाठी सोडला आहे. याठिकाणी काँग्रेसचे तालुक्याध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी ही जागा सोडण्यात आली आहे. आता पाटील आघाडीतून लढणार की अपक्ष, हे लवकरच स्पष्ट होईल.