Sangli News: मोर्चावेळी पोलिसांबद्दल अपशब्द वापरले, १६ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:55 IST2025-11-27T17:53:39+5:302025-11-27T17:55:30+5:30
बेकायदा जमाव जमवून कायदाभंग करणे, पोलिस कायदा कलम तसेच पोलिसांविषयी अप्रीतीची भावना चेतवणे या कलमानुसार गुन्हा दाखल

Sangli News: मोर्चावेळी पोलिसांबद्दल अपशब्द वापरले, १६ जणांवर गुन्हा दाखल
सांगली : दलित महासंघाच्या मोहिते गटाचा अध्यक्ष उत्तम मोहिते याच्या खूनप्रकरणी उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरून बेछूट आरोप केल्याबद्दल १६ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक भरत माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
संशयित विजय घाडगे, वनिता कांबळे, सतीश मोहिते, महावीर चंदनशिवे, योसेफ मोहिते, अर्जुन मोहिते, मेरी मोहिते, ज्योती मोहिते, संदीप पाटोळे, दत्ता राणे, दत्ता जगदाणे, राजू थोटे, वसीम शेख, प्रशांत केदार, राहुल घाडगे आणि युनूस कोल्हापुरे (सर्व रा. सांगली) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून कायदाभंग करणे, पोलिस कायदा कलम तसेच पोलिसांविषयी अप्रीतीची भावना चेतवणे या कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
उत्तम मोहिते खूनप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने पोलिस उपअधीक्षक कार्यालयावर मंगळवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात, खून प्रकरणातील अन्य संशयितांना अटक करावी, आरोपींवर कडक कारवाई करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, सीआयडीमार्फत तपास करण्यात यावा; तसेच घटनेतील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारास तत्काळ पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सतीश मोहिते आणि महावीर चंदनशिवे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याविरोधात अपशब्द वापरले. पोलिस उपअधीक्षक तसेच शहर पोलिस निरीक्षक यांनी संशयित आरोपींना चांगली वागणूक दिल्याचा आरोप केला. मोर्चावेळी पोलिस प्रशासनाविरुद्ध वेगवेगळ्या घोषणा दिल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.