मिरज, सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी; कोल्हापूर, कर्नाटकच्या तरुणांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 18:02 IST2025-11-21T18:01:44+5:302025-11-21T18:02:19+5:30
महिलेने सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढत लाखो रुपये उकळले; महिलेसह साथीदार ताब्यात

मिरज, सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी; कोल्हापूर, कर्नाटकच्या तरुणांना लुटले
मिरज : मिरजेतील एका महिलेने सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिरज, सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. मिरजेच्या वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून कोल्हापूर व कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांना जाळ्यात ओढल्याच्या तक्रारी आहेत. मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील फ्लॅटवर बोलावून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आले.
संबंधित महिला व तिच्या दोन ते तीन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील एका तरुणाने मिरज शहर पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली आहे.