Ratnagiri: दोन मंदिरे फोडली, खेडमध्ये चोरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चोरल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:46 IST2025-10-07T15:41:43+5:302025-10-07T15:46:34+5:30
धातूच्या वस्तूंना अधिक मागणी

संग्रहित छाया
खेड (जि. रत्नागिरी) : चाेरट्यांनी आपला माेर्चा मंदिरांकडे वळविला असून, गेल्या दाेन दिवसांत खेड तालुक्यातील दाेन मंदिरांमध्ये चाेरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चाेरल्या आहेत. त्याचबराेबर धातूच्या अन्य वस्तूही चाेरून नेल्या आहेत. या चाेऱ्या शिरगाव खुर्द शिवाजीनगर येथील काळकाई देवी आणि कुळवंडी येथील शिवशंकर मंदिरात झाल्या असून, तब्बल ३७,८०० रुपयांचा मुद्देमाल चाेरीला गेला आहे.
शिरगाव खुर्द येथील चाेरीबाबत प्रभाकर राजाराम भाेसले (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही चाेरी शनिवारी सायंकाळी उघडकीला आली. येथील काळकाई देवीचे मंदिर कायम उघडेच असते. या मंदिरातील पितळेच्या प्रत्येकी पाच किलाे वजनाच्या तीन घंटा चाेरट्याने चाेरून नेल्या आहेत. त्याचबराेबर प्रत्येकी पाच किलाे वजनाचे पितळेचे दाेन नामणदिवे (समई) आणि सीसीटीव्हीचा एक डीव्हीआर असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल चाेरून नेला आहे.
कुळवंडी येथील शिव शंकर मंदिरात चाेरी झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी मनाेहर महादेव जंगम (वय ५२, रा. कुळवंडी, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पितळेच्या ११ घंटा चाेरीला गेल्या आहेत. त्यामध्ये १२ किलाे वजनाची एक आणि प्रत्येकी २ किलाे वजनाच्या दहा घंटांचा समावेश आहे. त्याचबराेबर तीन पितळी धातूच्या समई, तांब्याचा नाग, गळती, दाेन टाेप आणि ताम्हण असा एकूण १७,८०० रुपयांचा मुद्देमाल चाेरट्याने चाेरून नेला आहे.
धातूच्या वस्तूंना अधिक मागणी
गेल्या काही महिन्यांत उत्तर रत्नागिरीच्या भागात मंदिरांमधील धातूच्या घंटा व इतर साहित्य चाेरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जुन्या धातूच्या वस्तूंना बाजारात चांगली किंमत आहे. त्यामुळे या वस्तूंची चाेरी करून त्या माेडीत विकण्यासाठी चाेरी हाेत असल्याचा संशय व्यक्त हाेत आहे.