रत्नागिरीतील स्कायवॉक प्रकल्प अधांतरी

By Admin | Updated: January 30, 2015 23:12 IST2015-01-30T22:57:52+5:302015-01-30T23:12:56+5:30

ठेकेदारच मिळेना : दीड वर्षांपूर्वी मिळाली मंजुरी; दोन कोटी रूपये पडून

Skywalk project at Ratnagiri | रत्नागिरीतील स्कायवॉक प्रकल्प अधांतरी

रत्नागिरीतील स्कायवॉक प्रकल्प अधांतरी

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील माळनाका येथील गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ये-जा करण्यासाठी मंजूर झालेला स्कायवॉक अद्याप रखडला आहे. दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या व २ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची निविदाच कोणी भरत नसल्याने हे काम कसे होणार, याबाबत आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. काही वर्षांपूर्वी माळनाका येथे एका अपघातात शाळकरी मुलीचे निधन झाले होते. या भागात पेट्रोलपंप, शाळा तसेच एस. टी. डेपो असल्याने कायम गर्दी व वाहनांची वर्दळही मोठी असते. त्यामुळे विद्यार्थी व पादचारी यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. परिणामी याठिकाणी होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. सकाळी व सायंकाळी याठिकाणी असलेल्या बसथांब्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्यामुळेही अपघातांची शक्यता असल्यानेच येते स्कायवॉक असावा, अशी कल्पना पुढे आली. त्यातूनच लोकप्रतिनिधींनी हा स्कायवॉकचा प्रकल्प येथे मंजूर करून घेतला.दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या या स्कायवॉकला २ कोटी १० लाख रुपये खर्च येणार आहे. माळनाका येथील एस. टी. डेपो ते वायंगणकर रेस्टॉरंटसमोरील जागेपर्यंत हा ५७ मीटर्सचा स्कायवॉक प्रकल्प आहे. याआधी दोनवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु त्या भरण्यात कोणीही स्वारस्य दाखविले नाही. आता तिसऱ्या वेळी या कामाची निविदा काढण्यात आली असून, त्यालाही कोणाचा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे स्कायवॉकबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिगर्दीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये जा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प रखडल्याने या प्रकल्पाबाबत ये रे माझ्या मागल्या असेच झाले आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदारच मिळत नाहीत?
जिल्ह्यात रस्त्यांवर कोठेही स्कायवॉक नाहीत. रत्नागिरीतील हा पहिलाच प्रकल्प आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाचे काम करणारे ठेकेदार जिल्ह्यात नसल्याने व मोठ्या शहरातील ठेकेदार छोट्या स्कायवॉक प्रकल्पासाठी रत्नागिरीत येण्यास राजी नसल्याने स्कायवॉक प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे.

Web Title: Skywalk project at Ratnagiri