मुंबईतील विक्रेते म्हणतात, आता आंबा पाठवू नका; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:33 IST2026-05-14T18:32:26+5:302026-05-14T18:33:22+5:30
दर वाढला मात्र खरेदी थांबली

संग्रहीत छाया
रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या उष्म्यामुळे झाडावरील आंबा लवकर तयार होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. त्यातच आखाती देशातील युद्धामुळे निर्यात बंद असल्याने नवी मुंबई उत्पन्न बाजार समितीत कोकणासह अन्य राज्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेला आंबा कुठे विकायचा, असा प्रश्न विक्रेत्यांपुढे आहे. त्यामुळे दर गडगडले आहेत. गडगडलेला दर परवडत असेल तर आंबा पाठवा, अन्यथा पाठवू नका असे विक्रेते सांगत असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला दरवर्षी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोहोर चांगला येऊनही अति थंडीमुळे मोहोर करपला व अपेक्षित फळधारणा झाली नाही. जेमतेम १५ ते २० टक्के उत्पादन असल्याचा अहवाल कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाने शासनाला दिला होता. दरवर्षी आखाती देशात हापूसला सर्वाधिक मागणी असते. मात्र यावर्षी युद्धामुळे वाहतूक खर्च वाढल्याने निर्यात थांबली. देशांतर्गत विविध राज्यांतील बाजारपेठेत आंबा विकावा लागला. त्यामुळे यावर्षी सुरुवातीला आंब्याला दर चांगला मिळाला असला, तरी नंतर मात्र दर गडगडतच गेले.
सध्या ४ ते ५ डझनाच्या पेटीला ७०० ते १,२०० रुपये दर आहे. अर्थात हजार ते १,२०० रुपये हा दर फक्त मोजक्याच बागायतदारांना मिळत आहे. उर्वरित बागायतदारांची पट्टी ७०० ते ८०० रुपये एवढीच आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात विक्रीला पाठवेपर्यंत येणारा खर्च पाहता सध्याचे परवडत नाही. स्वत: विक्रेतेच बागायतदारांना फोनद्वारे दर परवडत असेल, तरच विक्रीला पाठवा अन्यथा पाठवू नये, असे सांगत असल्यामुळे आंबा कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- पेटीला दर - ७०० ते ८०० रुपये
- खत व्यवस्थापन ते कीटकनाशक फवारणी खर्च - १५० ते २०० रुपये
- वाहतूक खर्च - १२५ रुपये
- पॅकींग खर्च २०० रुपये
- बागायदारांच्या पदरात - १७५ रुपये
तापमान वाढीमुळे आंबा तयार
यावर्षी मुळातच आंबा कमी आहे. परंतु, तापमान वाढल्यामुळे आंबा एकाच वेळी तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. नाशवंत फळ असल्यामुळे ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दराला बागायतदार विक्री करतात. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणासह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश येथून आंब्याची आवक वाढल्यामुळे बागायतदार मोठ्या प्रमाणावर आंबा आला आहे. कोकणच्या हापूसला सध्या बाजारात ३०० ते ४०० रुपये डझन दर मिळत आहे. परराज्यातील आंबा मात्र ७० ते ३५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.
दर वाढला मात्र खरेदी थांबली
दर कमी असताना कॅनिंगचे दर ५० रुपयांवरून थेट ३० रुपयांवर आणले गेले. याबाबत बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी कॅनिंग कंपन्यांना सज्जड दम भरत ५० रुपये दर देण्याची सूचना केली. मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेला कॅनिंग कंपन्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या असून, खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी बागायतदारांची अवस्था झाली आहे.