रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही धुवाधार

By Admin | Updated: June 29, 2016 00:05 IST2016-06-28T23:57:04+5:302016-06-29T00:05:25+5:30

लांजात युवतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : कसब्यात गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळले

Ratadnagar on the third day in Ratnagiri | रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही धुवाधार

रत्नागिरीत तिसऱ्या दिवशीही धुवाधार

रत्नागिरी : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात दाणादाण उडवणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत सरासरी ७५१.२६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. लांजात वैभव वसाहत येथे एक युवती विजेच्या धक्क्याने मृत झाली असून, संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे गणेश मंदिरावर वडाचे झाड कोसळून नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील आसूद येथील चार घरांना पावसामुळे धोका निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे जागोजागी पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सायंकाळी पावसाने काही वेळ विश्रांती घेतली होती. सोमवारी रात्री पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली. मंगळवारी दिवसभर पावसाचा हा वेग कायम होता. लांजा वैभव वसाहत येथे पाऊस असल्याने प्रणिता महादेव भोसले (वय १९) ही युवती घराच्या पायऱ्यांवर कपडे धूत होती. त्यानंतर दरवाजा ढकलून ती घरात जात असतानाच विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे ती जागीच ठार झाली.
संगमेश्वरातही पावसाचा जोर मंगळवारी कायम होता. तालुक्यातील कसबा येथील गणेश मंदिरावर गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास वडाचे मोठे झाड पडून मंदिराचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून, आसूद येथील चार घरांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार कविता जाधव यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करून या कुटुंबांना स्थलांतरित होण्याची सूचना केली आहे. चिपळुणात मुसळधार पावसामुळे नगर परिषदेच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली, तर कात्रोळी येथे सोमवारी एका घराची भिंत कोसळली. दरम्यान, तालुक्यातील वीर देवपाट येथील दरडग्रस्त भागाची तहसीलदार जीवन देसाई व उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांनी पाहणी केली.
मंडणगड, राजापूर, गुहागर, आदी भागांत पावसाचा वेग त्या मानाने कमी आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला असला तरीही शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड तालुक्यातही पावसाने जोर पकडला असून, नातूनगरसह अन्य धरणे पाण्याने भरली आहेत. (प्रतिनिधी)


पावसाचा वेगही वाढणार
येत्या २४ तासांसाठी हवामान खात्याने कोकणात सावधानतेचा इशारा दिला आहे. २८ जूनपासून पुढील २४ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ७ ते ८ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर त्यापुढील २४ तासात ७ ते १२ से.मी.पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त
केली आहे.

Web Title: Ratadnagar on the third day in Ratnagiri