शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

धुरळेवाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST

सकाळी लवकर म्हणजे पहाटे पाच वाजता निघायचे असल्याने आम्ही मुलेही लवकरच झोपी जायचो. तेव्हा टीव्ही, मोबाईल नसल्याने जागरणाचा प्रश्न ...

सकाळी लवकर म्हणजे पहाटे पाच वाजता निघायचे असल्याने आम्ही मुलेही लवकरच झोपी जायचो. तेव्हा टीव्ही, मोबाईल नसल्याने जागरणाचा प्रश्न नव्हता. सकाळी घरात न्याहरी बनवण्याची लगबग असे. आम्ही मुले उठलो की एकमेकांना हाका मारून जागे करायचो. वाड्याकडे जाताच बैलांना समजायचे आता आपले मजेचे दिवस संपले, पुढे दोन महिने कामच करायचे. बरेच दिवस कामाची सवय नसल्याने ते पण टोलवाटोलव करत. मग त्यांच्या शिंगात जुपण अडकवून आमच्या हातात टोक. पुढे नांगर, मध्ये बैल आणि आम्ही, मागोमाग न्याहरीवाल्या, ठेंगरे, कुदळ घेऊन बायामाणसे. जवळपास तासभर चालून खरी यायची. मग जोखडाखाली घालताना बैलांची मस्ती. सुरुवातीला जोत रुळावर यायला थोडा वेळ लागे. मध्येच वरा सोडून बैल आम्हाला दुसरीकडे ओढत नेत, मागोमाग दुसरे जोत पण बाहेर पडे. त्यांना पुन्हा मळीत आणायला सगळेच चार बाजूंनी जात. तेव्हा जोत धरणाऱ्या आमची फरपट होई. कारण बैलांच्या, जोतयाच्या (नांगर धरणारा) पायाला नांगराचा लोखंडी फाळ लागणार नाही, नांगर मोडणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागायची.

आमच्या खऱ्या म्हणजे अधेमध्ये अर्धा फूट जमीन नाहीतर सर्व कातळच. नांगरणी जपून करावी लागे. खडखड करत कधी क..... कट्ट होईल, याचा नेम नसे. जोडीला अधिकचा नांगर असे आणि मेस्त्री पण, चुलते कृष्णाआबा. त्यामुळे आम्हा लहानग्यांना (मी, भाऊ सुभाष, किरण, किशोर, विशाल) नांगर तुटला तरी चिंता नसे.

भात पेरून नांगरणी, कोपरे खणणे, ढेकळे फोडणे, जमीन सारखी करणे आदी कामात वेळ कधी जायचा कळायचे नाही. जोरात भूक लागे. मग भाकरी, सुकट, कोलीम पानावर घेऊन बांधावर बसून खाण्याची मौज न्यारीच म्हणायची. सूर्योदयाच्या अगोदर सुरु झालेले काम उन्हे डोक्यावर आली की सकाळ सत्रातले काम संपे. दुपारी विश्रांती झाल्यावर पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या खरीत. जवळजवळ १०-१२ दिवस आम्ही एकमेकांना मदत करून सर्वांची धुरळेवाफ पूर्ण करून द्यायचो. जसे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आले तसे बघताबघता सारे बदलले. गोठे, शेते ओस पडली. माणसामाणसात दुरावा वाढला. जो तो तुझे तू - माझे मी यात अडकू लागला. पण गेल्यावर्षी अचानक आलेल्या कोरोनाच्या आपत्तीने पुन्हा एकदा माणुसकी ओसंडून वाहायला लागली. शेती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, कोणतेही काम हलके नाही आणि जाताना कोणी काहीही नेणार नाही, मानवी देह नश्वर आहे, याची तीव्रतेने सर्वांना जाणीव झाली.

धुरळेवाफ करताना आम्ही जसे एकमेकांच्या मदतीला धावून जायचो, त्या माणुसकीची आठवण कोरोना काळात ताजीतवानी झाल्याचे पाहून मनस्वी समाधान वाटते. आपल्यालाही कोणाची तरी गरज आहे, हे तितकेच शाश्वत आहे, नाही का?

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा