अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:20 IST2026-05-07T12:19:59+5:302026-05-07T12:20:46+5:30
जे आरोप परब यांच्यावर ठेवण्यात आले, ते सिद्ध करता आले नसल्याने देण्यात आला निकाल

अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून माजी मंत्री अनिल परब, प्रांताधिकारी देशमुख आणि अन्य तीन आरोपींची खेड येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे, जे आरोप परब यांच्यावर ठेवण्यात आले होते ते सिद्ध करता आले नाहीत, म्हणून हा निकाल देण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टच्या उभारणीवरून माजी मंत्री अनिल परब, प्रांताधिकारी देशमुख, मुरुडचे मंडल अधिकारी, मुरुडचे तलाठी तसेच मुरुडचे सरपंच अशा पाच जणांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू होता. बेकायदेशीर बांधकाम तसेच नियमांचे उल्लंघन करून पार पाडलेल्या प्रक्रिया, सरकारची फसवणूक आणि लाचलुचपत प्रतिबंधक आरोपाचाही यात समावेश होता. मात्र हे आरोप पुराव्यानिशी सिद्ध न करता आल्याने खेड न्यायालयाने अनिल परब व अन्य आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.