Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:28 IST2025-10-03T18:25:12+5:302025-10-03T18:28:34+5:30
संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात नुकताच गुन्हा दाखल झाला होता

Ratnagiri: टीडब्ल्यूजेच्या २३ जणांवर पुण्यातही गुन्हा दाखल, गुंतवणूकदारांची ६ कोटींची फसवणूक
चिपळूण : राज्यभरात शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकीचे जाळे उभारून अल्प कालावधीत हजारो कोटीचा फंड उभारणाऱ्या टीड्ब्ल्यूजेचा संचालक समीर नार्वेकर याच्यासह चौघांवर चिपळुणात २८ लाखांच्या फसवणूक प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला होता. त्यापाठोपाठ पुणे कर्वेनगर येथे २ ऑंक्टोंबर रोजी याच कंपनीच्या तब्बल २३ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रूपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामध्ये मुळ संचालकासह पुण्यातील कंपनीच्या प्रतिनीधींचा समावेश आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
चिपळूण तालुक्यातील कामथे येथील प्रतिक दिलीप माटे यांनी मागिल आठवड्यात पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार समीर नार्वेकर याच्या सोबत त्याची पत्नी नेहा नार्वेकर, सहकारी संकेश रामकृष्ण घाग व सिद्धेश शिवाजी कदम या चौघांवर २८ लाख ५० हजार रूपयांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापाठोपाठ आता राज्यभरातही या कंपनीकडून फसवणूक झाल्याचे प्रकार उघड होऊ लागले आहेत.
पुणे कर्वेनगर येथील पोलिस स्थानकात गुरूवारी २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये टीड्ब्ल्यूजेचा मुळ संचालक समीर नार्वेकर (टीड्ब्ल्यूजे पुणे वारजे माळवाडी), नेहा समीर नार्वेकर तसेच प्रतिक जासतकर, रोहित मस्के, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, अमित विश्वनाथ बालम, किरण कुंडले, सुरज सँकासने, प्रणव बोरडे, संकेश घाग, सिद्धेश पाटील, अविनाश कदम, सचिन पाटील, देवा घाणेकर, स्वप्निल देवळे, सौरभ गोरडे, प्रसन्ना मंगेश करंदीकर, मोहन कोरगांवकर, माहेश्वरी पाटणे, रघूवीर महाडीक, ऋषीकेश सुधीर पाटील, सोनाली पाटील आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
कंपनी संचालक व प्रतिनीधींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुंतवलेल्या रकमेवर जादा परताव्याचे अमिष दाखवले. तसा परतावा देण्याची खात्री देऊन गुंतवणूकीवर फ्रॅचायझी बिझनेस करार बनवून नोटरी करून दिली. त्याप्रमाणे गुंतवणूक करण्यास अनेकांना भाग पाडले. मात्र आता मार्च महिन्यापासून काहींना परतावा देण्याचे कंपनीने बंद करून वेळोवेळी कारणे देत आहेत. नियोजीत कट रचून तब्बल ६ कोटी १० लाख २८ हजार ७६० रूपयांची फसवणूक केली. त्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.