निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:32 PM2020-06-06T23:32:29+5:302020-06-06T23:33:02+5:30

कोट्यवधी रुपयांचे नुकसान । घरांची पडझड, शेती जमीनदोस्त; नगरपालिका शाळा, एसटी स्थानक येथे स्थलांतरितांना आसरा

Shrivardhan devastated by nature cyclone | निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त

निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त

Next

श्रीवर्धन : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी रायगड तालुक्यात थैमान घातले. त्याचा मोठा फटका श्रीवर्धनला बसला आहे. वाऱ्याचा तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. कौलारू घरांची छते, पत्रे, शेतीतील केळी, सुपारी, नारळ सर्व काही नष्ट झाली आहेत.
एकूण झालेली हानी पाहता श्रीवर्धन तालुका वादळाचा केंद्रबिंदू असावा असे वाटते. श्रीवर्धन शहरातील सर्व पाखाडी, आळीतील रस्त्यावर झाडे आडवी पडली आहेत. लोकांनी स्वत: आपापल्या पाखाडीतील रस्त्यावर आलेली झाडे तोडण्यास सुरुवात केली आहे. पाऊस व वारे यामुळे सर्व शेतीतील उभी पिके नष्ट झाली आहेत. विद्युत महामंडळाचे सर्व पोल आडवे पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा अनिश्चित कालावधीसाठी खंडित झाला आहे. अनेक लोकांना शाळा व सरकारी कार्यालयांत स्थलांतरित करण्यात आले आहे.

निर्वासित लोकांना शासकीय यंत्रणेमार्फत अन्नपुरवठा केला जात आहे. श्रीवर्धन शहरातील सर्व नगरपालिका शाळा, एसटी स्थानक येथे स्थलांतरित लोकांना आसरा देण्यात आला आहे . शहरातील धोकादायक असलेल्या धोंड
गल्ली, मेंटकर्णी, जीवना कोळीवाडा येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वादळानंतर प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी व मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांनी तत्काळ शहरातील सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे.

कार्लेखिंड विभागात
अतोनात नुकसान

अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड-रेवस, मांडवा विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ आणि पाऊस याचा जोर इतका होता की, प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन घरात बसला होता. गावातील घरांचे छप्पर उडाले तसेच घरावरील कौले-ढापे उडाल्याने सगळ्यांच्या घरात पाणी झाले होते. विद्युत खांब अनेक ठिकाणी कोसळले असल्याने चरी रेवस फिडरवरील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी बांधवांच्या शेतबांधावरील आणि बागेतील आंबा कलमे मोडून नुकसान झाले आहे.

जनजीवन ठप्प
रेवदंडा : चक्रीवादळाचा तडाखा अलिबाग तालुक्यातील चौल-रेवदंडा या गावांना चांगलाच बसला असून या वादळाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. सुपारी-नारळाची अगणित झाडे पडलेली असून बागायतदार या बागायती स्वच्छ कशा करायच्या या विवंचनेत आहेत. अनेक वीजवाहिन्या तसेच विजेचे खांब तुटल्याने विघुत पुरवठा सुरळीत कधी होणार, हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

तळा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
तळा : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका तळा तालुक्याला बसून तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काहींच्या घराचे छप्पर उडाले तर काहींच्या घरावर भलेमोठे झाड कोसळले. जी घरे पक्की व आरसीसी बांधकाम केलेली होती त्यांच्या घरांना मोठा फटका बसला नाही, मात्र ज्या नागरिकांची घरे कौलारू व ज्यांच्या घरावर पत्र्याची शेड होती अशा नागरिकांना याचा मोठा फटका बसून त्यांना भर पावसात आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी कुटुंबासह जावे लागले. वाºयाच्या तीव्र वेगामुळे झाडांसह विद्युत खांबसुद्धा मोठ्या प्रमाणावर कोसळले असून बत्ती गूल झाली आहे. विजेसह सर्व कंपन्यांच्या मोबाइलचे नेटवर्कसुद्धा गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला होता. गावकऱ्यांनी एकजूट दाखवत एकमेकांना सहकार्य करून आपली मोडलेली घरे पुन्हा सावरण्यास मदत केली.

नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
सुनील तटकरे। चक्रीवादळात ५० कोटींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर मुरूड तहसीलदार कार्यालयात शहरातील स्थानिक कार्यकर्ते व प्रांत अधिकाºयांच्याशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली.
आतापर्यंत चक्रीवादळात अंदाजे ५० कोटींचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार सुनील तटकरे त्यांनी प्रशासनाला दिले.
मुरूड तालुक्यात विविध भागांत नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले, झाडे कोसळली, विजेचे खांब पडले. शासनातर्फे हेक्टरीच्या हिशोबाने भरपाई दिली जाते. परंतु तशी न देता एक झाड पाच वर्षाला किती उत्पन्न देत आहे त्या अनुषंगाने भरपाई मिळावी याकरिता मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करून शेतकºयांसाठी चांगला निर्णय घेऊन योग्य ती भरपाई देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सुनील तटकरे म्हणाले.
पत्रे, कौले खरेदीकरिता
येणाºया नागरिकांकडून जर
दुकानदार जास्त पैसे आकारत असेल तर त्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रांत अधिकाºयांना तटकरे यांनी दिले.
 

Web Title: Shrivardhan devastated by nature cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड