Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:27 IST2025-06-20T09:26:34+5:302025-06-20T09:27:37+5:30

Maharashtra Rains: रायगड जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्रीपासून जोर धारांनी झोडपले.

Raigad: 129.3 mm rain recorded in 24 hours | Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!

Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग: रायगड जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्रीपासून जोर धारांनी झोडपले. यामुळे कुंडलिका, आंबा, गांधारी आदी प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. नागोठणेमध्ये तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग-रोह्यासह अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

अलिबाग, तळा, पोलादपूर, रोहा, महाड या तालुक्यांत पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. बोरघर रस्त्यावर पाणी साचले असल्याने अलिबाग-रोहा रस्ता बंद झाला आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीनेही इशारा पातळी ओलांडली होती. रोहा तालुक्यातील चिंचोली तर्फ आतोणे ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी येथील राजेश जाधव यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. 

नागोठण्यात पुराच्या पाण्याचे थैमान
नागोठण्याजवळून वाहणाऱ्या अंबा नदीने गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. पुरामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. मिनिडोअर रिक्षा स्टँडच्या परिसरात तसेच नागोठणे बसस्थानकासमोरील परिसरात पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. महाडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस 
पालघर जिल्ह्यात बुधवारपासून पुन्हा पावसाने दमदार सुरूवात केली आहे. विशेष करून वसईसह वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यातही ग्रामीण भागात पावसाचा चांगला जोर होता. काही नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला. पालघर जिल्ह्यात एकूण १५२.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला असून एकूण २६७.२ इतका सरासरी पाऊस झाला आहे. पावसाने नदी, नाले, ओहोळ दुथडी  भरून वाहत होते. वसईमधील पूर्वेकडील तुळींज रस्त्यावर गुरुवारी पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. 

Web Title: Raigad: 129.3 mm rain recorded in 24 hours