जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

By Admin | Updated: April 18, 2017 06:47 IST2017-04-18T06:47:53+5:302017-04-18T06:47:53+5:30

पाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले

The problem of water scarcity in the district is serious | जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर

जयंत धुळप, अलिबाग
पाऊस चांगला झाला...पीकही चांगले आले...शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले... आणि यंदा तरी पाणीटंचाईपासून मुक्ती मिळणार या आशेने नागरिकही समाधानी झाले. मात्र पाणीटंचाईमुक्त रायगडचे स्वप्न जिल्ह्यातील ३७ ते ४२ अं.से.च्या तापमानात यंदा पूर्णपणे विरून गेले आहे. वाढत्या तापमानाबरोबर पाणीटंचाईची झळ यंदा जिल्ह्यातील ३६७ गावे आणि १ हजार १०९ वाड्यांमधील ग्रामस्थांना बसणार आहे. जिल्ह्यातील या सर्व टंचाईग्रस्त गाव-वाड्यांतील ग्रामस्थांची तहान भागविण्याकरिता तब्बल ६ कोटी २५ लाख १० हजार रुपये जिल्हा प्रशासनाला खर्च करावे लागणार आहे. यंदाचा टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला असून तो राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ३६७ गावांपैकी सर्वाधिक टंचाईग्रस्त ४८ गावे तर टंचाईग्रस्त एकूण १ हजार १०९ वाड्यांपैकी सर्वाधिक २७२ वाड्या या एकट्या पोलादपूर तालुक्यामध्ये आहेत. पोलादपूरशेजारील महाड तालुक्यात ३६ गावे तर २२० वाड्या टंचाईग्रस्त आहेत. महाड-पोलादपूर बरोबरच कर्जत तालुक्यात देखील मोठे जलदुर्भिक्ष जाणवत असून या तालुक्यात ४४ गावे तर ३७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. एकेकाळी टंचाईमुक्त झालेल्या अलिबाग तालुक्यात देखील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून १२ गावांबरोबरच ७१ वाड्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पेण तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील जलदुर्भिक्ष यंदाही कायम असून, पेण तालुक्यातील १५४ वाड्यांबरोबरच ३९ गावांमध्ये पाणीटंचाई आहे.
१५ एप्रिल २०१७ रोजीच यंदा जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त १२ गावे आणि ७४ वाड्यांना १३ टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. महाड तालुक्यातील २ गावे आणि ६ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यातील ४ गावे आणि २६ वाड्यांना प्रत्येकी तीन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पेण तालुक्यातील ४ गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेलमधील दोन वाड्या, खालापूरमधील एक गाव व एक वाडी, रोहा तालुक्यातील एक वाडी तर श्रीवर्धनमधील दोन वाड्या यांना प्रत्येकी एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा देखील संकलित झाला, परंतु जिल्ह्यातील लक्षणीय तापमानामुळे तो जलसाठा पाणीटंचाई दूर करण्यात यशस्वी होऊ शकलेला नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ केवळ टँकर्स आणि विंधण विहिरींची पारंपरिक मात्रा देणे प्रशासनाच्या हाती राहिले आहे.

Web Title: The problem of water scarcity in the district is serious