In the mechanical age the survival of the bullock is in danger | यांत्रिक युगात बैलगाडीचे अस्तित्व धोक्यात
यांत्रिक युगात बैलगाडीचे अस्तित्व धोक्यात

- विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुका व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात व इतरत्र शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अशातच शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेली बैलगाडी शेतकऱ्यांसाठी मोलाची आहे. मात्र, बदलत्या तंत्रयुक्त व यांत्रिकीकरणाच्या काळात ग्रामीण भागातून बैलगाड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबरोबरच घराघरांत दिसणारी सर्जा-राजाची खिल्लारी जोडीही दुर्मीळ झाली आहे.

देशी जनावरांबाबत सरकारची अनास्था दिसून येत आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे खिलार गाय, बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच दोन दशकांपासून पशुधन नष्ट होत असल्याची आकडेवारी समोर येत असून, पशुधन वाचविण्याची
जबाबदारी आता शेतकºयाबरोबरच पर्यावरणप्रेमी व नागरिकांवर आली आहे. एकेकाळी बैलगाड्यांची सफर म्हणजे जणू हवाई सफरीचा आनंद मिळायचा.

शेत, शिवारासह दुर्गम, डोंगराळ भाग, तसेच नागमोडी वळणावरून खडकाळ चिखल मातीच्या रस्त्यावरून सुसाट धावणाºया बैलगाड्या काळाच्या ओघात नजरेस पडणे, दुर्मीळ झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रस्त्यांचा विकास झाला नव्हता, त्या वेळेस बैलगाडी हे दळणवळणाचे व वाहतुकीचे मुख्य साधन मानले जायचे. इतर वाहनांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच होती.

एखादे वाहन गाव-खेड्यापाड्यात दाखल झाले तर ते बघण्यासाठी गर्दी जमायची. अशा काळात बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे ज्याच्या घरात बैलगाडी त्या घराला प्रतिष्ठा मिळत असे. विशिष्ट कार्यक्रम सोहळ्यात बैलगाडीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. नवरदेवाची मिरवणूक, जयंती असो की पालखी सोहळा, बैलगाडीचाच वापर होत असे. शेतीसाठी आवश्यक साहित्य बाजारातून आणणे, तसेच धान्य खरेदी-विक्री करणे, या कामात बैलगाडीचा मोठा वापर होत असे.

बैलगाडी बनविण्यासाठी साधारणत: दहा ते बारा हजार रुपये खर्च व्हायचा. यामध्ये कारागीर व सुताराला मजुरीदेखील मिळायची. शेतकºयाच्या मागणीनुसार लाकडाच्या वापराने सुबक, मजबूत व कलाकुसर करून बैलगाड्या बनविल्या जायच्या. अशा बैलगाडीतून जत्रा, बाजार व दूरवरचा फेरफटका म्हणजे आगळी वेगळी पर्वणीच. त्यानंतर लोखंडी बैलगाड्या बनविण्यास सुरुवात झाली. रस्त्यांचे जाळे वाढल्याने शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा, टॅम्पो व इतर मालवाहतुकीची साधने आल्याने बैलगाडी काळाच्या ओघात मागे पडली.

प्रोत्साहानासाठी विशेष प्रयत्न व्हावेत

कालांतराने येणाºया पिढीला ज्याप्रमाणे पशूपक्षी व प्राणी पुस्तकात पाहवे लागतात. त्याप्रमाणे बैलगाडीही पुस्तकात पाहवी लागेल, असे दिसते. त्यामुळे शासनाने गाय, बैल व अन्य जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच रोडावलेल्या बैलांची व बैलगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
वेगवान वाहनांच्या वापराने जलद वाहतूक होऊ लागली आणि हळूहळू शेतीच्या कामासह दळणवळणाच्या कामातही बैलगाडीचा वापर कमी होत गेला. आता रस्त्यावर कधीतरी एखादी बैलगाडी दिसते. त्यामुळे शहरातून गावाकडे येणारी बच्चेकंपनी कुतूहलाने बैलगाडी सफरीचा आनंद घेताना दिसतात. याशिवाय काही ठिकाणी घोडेस्वारी, उंटाच्या सफारीप्रमाणे बफोलो राइडची सुविधाही उपलब्ध केली जात आहे.

Web Title:  In the mechanical age the survival of the bullock is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.