मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव! ६ गाड्या आदळल्या; कारवर कंटेनर उलटून तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 18:49 IST2026-03-18T18:45:45+5:302026-03-18T18:49:56+5:30

बोरघाटात झालेल्या या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.

Horror on Mumbai Pune Expressway 3 Killed 5 Injured in Massive 6 Vehicle Pile up Near Khopoli Exit | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव! ६ गाड्या आदळल्या; कारवर कंटेनर उलटून तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव! ६ गाड्या आदळल्या; कारवर कंटेनर उलटून तिघांचा मृत्यू

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ भरधाव वेगातील एका कंटेनरने नियंत्रणाबाहेर जात पाच वाहनांना अक्षरशः चिरडले. या अपघातात एक अवाढव्य कंटेनर थेट कारवर पलटी झाल्याने गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळी ९:४० च्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर खोपोली बोगद्यातून बाहेर पडत होता. यावेळी चालक अवधेश यादव याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर वाहनांना धडक देऊ लागला. कंटेनरने आधी एका कारला उडवले, त्यानंतर दुसऱ्या कारला आणि एका आयशर टेम्पोला धडक दिली. हा वेग इतका प्रचंड होता की, समोर असलेल्या एका एसयूव्ही कारला जोरदार धडक देऊन कंटेनर थेट त्या कारवरच आडवा झाला. या भीषण धडकेत पुढे असलेल्या एका बलकरलाही फटका बसला. अशा प्रकारे एकूण सहा वाहनांचा महामार्गावर चक्काचूर झाला.

कारवर कंटेनर कोसळल्याने गाडीचा पत्र्याचा गोळा झाला होता. यात प्रवास करणारे श्रीकांत अनंत जाधव (६३, पुणे), अंबादास दामू पेटारे आणि प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला. टाटा टिगोरमधील प्रवासी स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड आणि स्वतः कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

युद्धपातळीवर बचावकार्य

अपघाताचा आवाज होताच महामार्गावर मोठी खळबळ उडाली. बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबीचे पथक, डेल्टा फोर्स आणि हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या साहाय्याने इनोव्हावर पडलेला कंटेनर हटवून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या प्रक्रियेमुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर काम करून रस्ता मोकळा केला.

चालकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कंटेनर चालक अवधेश यादव विरोधात हलगर्जीपणा आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरघाटातील तीव्र उतार आणि वाहनांचा वेग यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर मौत का तांडव: छह गाड़ियाँ टकराईं, तीन की मौत

Web Summary : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे पर एक कंटेनर ट्रक अनियंत्रित होकर कई वाहनों से टकरा गया। कंटेनर एक कार पर पलट गया, जिससे तीन लोगों की मौके पर ही मौत हो गई। पांच अन्य गंभीर रूप से घायल हैं और उनका इलाज चल रहा है। पुलिस ने ट्रक ड्राइवर के खिलाफ लापरवाही से गाड़ी चलाने का मामला दर्ज किया है।

Web Title : Mumbai-Pune Expressway Carnage: Six Vehicles Collide, Three Dead

Web Summary : A container truck lost control on the Mumbai-Pune Expressway, crushing multiple vehicles. Three people died instantly when the container overturned onto a car. Five others sustained serious injuries and are receiving treatment. Police have registered a case against the truck driver for negligent driving.