'तू महिलांना शिवीगाळ केली', अतिक्रमण कारवाई करणाऱ्या निरीक्षकाला धक्काबुक्की; भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:55 IST2026-04-17T17:55:01+5:302026-04-17T17:55:45+5:30
'तू महिलांना शिवीगाळ केली, तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करतो’, अशी धमकी देत अतिक्रमण कारवाईस विरोध करुन गाडीची काच एकाने फोडली

'तू महिलांना शिवीगाळ केली', अतिक्रमण कारवाई करणाऱ्या निरीक्षकाला धक्काबुक्की; भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा
पुणे : अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेतील सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना हडपसरमधील हांडेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड आणि सोनू सुदेश रोकडे (सर्व रा. हांडेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून गुरुवारी (दि. १६) सायंकाळी सातच्या सुमारास हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी हांडेवाडी परिसरातील भाजीविक्रेत्या महिलांनी कारवाईस विरोध करुन लावंड यांना धमकावले. ‘तू महिलांना शिवीगाळ केली. तुझ्याविरोधात गुन्हा दाखल करतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर अतिक्रमण कारवाईस विरोध करुन लावंड यांच्या गाडीची काच एकाने फोडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजीविक्रेत्या महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख पुढील तपास करत आहेत.