दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 11:03 IST2025-08-23T11:02:41+5:302025-08-23T11:03:37+5:30

एका महिलेला आश्रमात बोलावून शरीरसुखाची मागणी केली असता महिलेने पोलिसात तक्रार केली

Women have been molested in the ashram for a year and a half in the name of witchcraft; Bhondubaba arrested | दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक

दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक

राजगुरूनगर : चांडोली (ता. खेड ) या परिसरात एका भोंदूबाबाने जादूटोण्याच्या नावाखाली शिवदत्त आश्रम मठात श्रद्धेने येणाऱ्या महिला भक्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन महिलांच्या भावनेशी खेळत विनयभंग केल्याप्रकरणी एका भोंदूबाबावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली असून नवनाथ पंढरीनाथ गवळी (वय ५३) असे त्याचे नाव आहे.

याबाबत खेडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ ऑगस्ट रोजी दाखल झाल्याने भोंदूबाबाच्या कारनाम्याचा एका ३५ वर्षीय महिलेने पर्दाफाश करत पोलिसात गुन्हा दाखल केला. या भोंदूबाबाने अनेक महिलांभोवती जाळे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन तीन महिला पुढे आल्याने या घटनेला वाचा फुटली. गवळी बाबाने दीड वर्षापूर्वी राजगुरुनगर येथे गढई मैदान परिसरात दत्तभक्त असल्याचा दावा करत आपले दुकान घरात थाटले होते. शहरातील काही भक्तगणांनी चांडोली येथे स्वखर्चाने जागा घेऊन शिवदत्त नावाने आश्रम सुरु केला. एक दीड वर्षापासून सुरु झालेल्या आश्रमात एक ३५ वर्षीय महिला पती सोबत सकाळ संध्याकाळ दर्शनासाठी जात होती. तुझ्या अंगात कालीमाता आहे. हे काढण्यासाठी होमहवन करण्यासाठी ही महिला आश्रमात जात होती. गेल्या १७ जुलै रोजी ही महिला पहाटे पती सोबत आश्रमात गेली असता पतीला दूध आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले. यावेळी भोंदूबाबाने महिलेचा विनयभंग केला. तर त्याच सायंकाळी महिला पुन्हा आश्रमात आली असताना पुन्हा पतीसोबत घरी निघाली असता पतीला पुढे जा थोडे बोलायचे सांगून महिलेचा हात पकडत शरीर सुखाची मागणी केली. त्यानंतर या भोंदूबाबाने संबंधित महिलेला दूरध्वनीवरून त्रास देण्यास सुरुवात केली. अखेर कंटाळून संबंधित पीडितेने पोलिसात तक्रार दिली.

Web Title: Women have been molested in the ashram for a year and a half in the name of witchcraft; Bhondubaba arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.